"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
अनेकातल्या एक-नाम-तत्त्वाचं निदर्शन करणारं सद्गुरु तत्त्वाचं नाम म्हणजे ‘नमो गुरवे वासुदेवाय’ आणि त्याचं ‘श्रीगुरुवासुदेवयंत्र’ पूरक अथवा मुख्य अशा दोन्ही साधना प्रकारांद्वारे उपयुक्त ठरू शकतं. ज्यांना अजून सगुण सद्गुरुंचा लाभ झालेला नाही, अशा सर्व इच्छुक साधकांनीही नमो गुरवे वासुदेवाय- मंत्र व यंत्र साधना या ग्रंथातले विचार हीच सद्गुरुतत्त्वाची आज्ञा समजून ह्या साधनेचा संकल्प करायला हरकत नाही.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

||नमो गुरवे वासुदेवाय|| -- मंत्र साधना

‘नमो’- म्हणजे नम:. ही ह्या मंत्राची शक्ती आहे. ‘सगुणापुढे नतमस्तक झाल्याशिवाय त्यातल्या निर्गुणापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून मी त्या सगुणाला नमस्कार करतो आहे’, अशी ज्ञानयुक्त भक्ती इथे अपेक्षित आहे. जो जो भक्त हा अर्थ जाणून एकाग्रतापूर्वक आणि नमनपूर्वक ह्या मंत्राचं पठण करील, त्या त्या भक्ताची ही शक्ती जागृत होईल.
‘गुरवे’– गुरवे हा शब्दामध्ये ‘गुरु’ हे ह्या मंत्राचं बीज आहे. संपूर्ण वृक्ष एखाद्या छोट्या बीजातून निर्माण होतो. म्हणजेच त्या बीजामध्ये संपूर्ण वृक्षाची शक्ती सामावलेली असते. ह्याचा अर्थ सूक्ष्म असलेलं प्रत्येक बीज सामर्थ्यवान असतं. तद्वतच मंत्रशक्तीचं सृजन ज्यातून घडते ती मूळ शक्ती म्हणजे हे बीज आहे, जे सत्कर्माची शक्ती, नामाची शक्ती वाढविण्यासाठी साहाय्यक ठरतं. जेव्हा ‘वासुदेव’ ह्या शब्दामागे ‘गुरवे’ हा शब्द जोडला जातो तेव्हा त्या वासुदेव नामक परमात्म्याच्या गुरुरूपाला आपण नमस्कार करत असतो.
‘वासुदेव’ हा ह्या मंत्रातला कीलक आहे. कीलक म्हणजे पाचर किंवा मेख. कित्येक जन्मांच्या पुनरावृत्तीनंतर एखाद्या जाड बुंध्याच्या वृक्षाप्रमाणे आपली जन्मजन्मांतरीची पापं जमा झालेली असतात. कर्मांचा हा जाड बुंधा कापल्याखेरीज त्याच्या फळांपासून आपली सुटका नसते. परंतु होतं काय की कितीही साधना केली तरी जीवनातल्या आपल्या निरनिराळ्या आसक्तींमुळे हा बुंधा एकाच जन्मात पूर्णपणे कापला जात नाही. अशा वेळी भक्ताच्या प्रयत्नांना संरक्षण देण्याचं आणि त्याच्या यशपूर्तीला गती देण्याचं काम कीलकामुळे शक्य होतं. ज्याप्रमाणे पाचर लाकडाचा भेद करते, त्याचप्रमाणे कर्माचे तुकडे करण्याचं काम ही वासुदेव नामक पाचर करते.
श्रीगुरु वासुदेव यंत्र
निर्मितीला त्राण देतं ते यंत्र, अशी यंत्र शब्दाची व्याख्या आहे. मंत्रशक्तीला सुनियोजित पद्धतीने प्रकट करून, तिचं योग्य मार्गाने वहन करण्याचं कार्य यंत्राच्या माध्यमातून केलं जातं. व्यवहारातही एखाद्या वस्तूची निर्मिती सुलभपणे आणि अगदी वेगाने होण्याकरता एखाद्या यंत्राची मदत घेतली जाते. तद्वत मंत्र साधनेतून निर्माण होणाऱ्या शक्तिनिर्मितीच्या प्रक्रियेला अधिक चालना देण्यासाठी त्याला यंत्र साधनेची जोड प्राचीन काळापासून देण्यात आली आहे. मंत्र-यंत्राच्या योगे निर्माण झालेली प्रचंड आध्यात्मिक शक्ती ही साधकाच्या आणि पर्यायाने संपूर्ण विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयुक्त ठरेल. ह्याच भव्य हेतूने प्रेरित होऊन ‘श्रीगुरू वासुदेव यंत्राची’ निर्मिती सद्गुरुतत्त्वाच्या प्रेरणेने आणि आज्ञेने झाली आहे. गणित आणि यंत्रशास्त्राच्या तत्त्वाधिष्ठित अशा भक्कम पायावर निर्मिती झालेल्या ह्या यंत्रामध्ये श्री यंत्र, दत्त यंत्र आणि बगलामुखी यंत्र एकत्रितरित्या गुंफले आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B