"वासुदेव उवाच"
"वाईट गोष्टींचा अभ्यासपूर्वक विरोध करणं, पण त्याचबरोबर मनाला चांगल्या कामाकडे प्रवृत्त करणं हेच, बुद्धीमानांकडून अपेक्षित असतं."
एकविसाव्या शतकात अत्यंत महत्त्वाचे ठरलेले लेसर तंत्रज्ञान, फायर ऑपटिक तंत्रज्ञान, सुपर कंडक्टर तंत्रज्ञान, क्वांटम संगणकशास्त्र ह्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पाया ज्या क्वांटम पदार्थविज्ञानावर उभा आहे, त्या पायाचे एक महत्त्वाचे शिल्पकार म्हणजे भारतीय वैज्ञानिक श्री सत्येंद्रनाथ बोस. १ जानेवारी १८९४ मध्ये त्यांचा जन्म कलकत्ता इथे झाला. लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धी असलेल्या सत्येंद्रनाथ ह्यांना प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता इथे, श्री जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र राय ह्यांच्यासारखे शिक्षक लाभले तर मेघनाद सहा (खगोलशास्त्रज्ञ) ह्यांच्यासारखे सहाध्यायी लाभले.
गणितामध्ये पदव्युत्तर शिक्षण अव्वल गुणांनी प्राप्त केल्यानंतर श्री सत्येंद्रनाथ ह्यांनी ढाका विद्यापीठात अध्यापक म्हणून शिकवायला सुरुवात केली. अध्यापन करतानाच त्यांनी पदार्थविज्ञान, सांख्यिकीशास्त्र आणि गणितात संशोधन सुरु ठेवलं आणि मेघनाद सहा ह्यांच्या समवेत अनेक शोधलेख प्रसिद्ध केले. अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांच्या मूळ जर्मन भाषेत प्रसिद्ध झालेल्या सापेक्षता (relativity) ह्या विषयावरच्या अनेक शोध लेखांचे भाषांतर ह्या दोघांनी मिळून इंग्रजी मध्ये केले. ह्याच काळात विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच, एक दिवशी श्री बोस ह्यांना क्वांटम विज्ञानाच्या एका महत्त्वाच्या सिद्धांताला स्पष्ट करणाऱ्या प्रमेयाचा शोध लागला. ह्या शोधावर वर आधारित असलेला लेख जेव्हा त्यांनी जगद्विख्यात आईनस्टाईन ह्याना पाठवला तेव्हा आईनस्टाईन अतिशय प्रभावित झाले. क्वांटम सांख्यिकी शास्त्रामध्ये खळबळजनक असा हा शोध पारतंत्र्यात असलेल्या आणि कोणतीही सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यापीठातल्या एका अज्ञात शास्त्रज्ञाने अगदी सहजपणे लावला होता! ह्या शोधानंतर सत्येंद्रनाथ ह्यांची आईनस्टाईन ह्यांच्या बरोबर घट्ट मैत्री झाली, त्यांच्यात पत्र व्यवहार सुरु झाला. पुढे युरोप मध्ये जाऊन, श्री बोस ह्यांनी सर आईन्स्टाईन, मादाम मेरी क्युरी, ब्रोग्ली ह्या सारख्या विख्यात संशोधकांसमवेत काम केले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या आधारे पुढच्या काळात ज्या महत्वाच्या प्रकाश किरणांचा (photon) शोध लागला त्यांना “बोसॉन” (boson) असे नामकरण दिले गेले. असं म्हणतात की ह्या संपूर्ण विश्वातला निम्मा भाग ह्या बोसॉन कणांनी व्यापलेला आहे!
बंगालच्या फाळणीनंतर स्वातंत्र्योत्तर काळात श्री बोस कलकत्ता इथे परत आले, तिथे त्यांनी अनेक अग्रणी संशोधन संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. पद्मविभुषण सन्मान प्राप्त केलेल्या श्री सत्येंद्रनाथ ह्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच सन्मान प्राप्त झाले. श्री रबीन्द्रनाथ टागोर ह्यांनी स्वतः लिहिलेले एक पुस्तक श्री सत्येंद्रनाथ ह्यांना समर्पित केले. टागोरांच्या विश्वभारती विध्यापीठात त्यांनी काही काळ उपकुलगुरु म्हणूनही कार्य केले. जवळ जवळ सलग पंधरा वर्ष ते “ राष्ट्रीय प्राध्यापक” ह्या भारतात अत्यंत श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या पदावर होते. मात्र मानाचा समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आले !
अत्यंत साधी राहणी, कमालीची निरहंकारी वृत्ती असलेल्या ह्या विश्वविख्यात महापुरुषाने १९७४ मध्ये आपला देह पंचतत्त्वात विलीन केला. त्यांच्या नावाने सुरु झालेली SN Bose National Centre for Basic Sciences ही कलकत्ता स्थित संस्था आज विज्ञानात नवीन शोधकार्य करते आहे.


||इदं न मम||

संदर्भ –
विकिपिडीया https://en.wikipedia.org/wiki/Satyendra_Nath_Bose

Short film “ The Quantum Indians”
https://www.youtube.com/watch?v=7z9NUV_YrOo