"वासुदेव उवाच"
"संसार हा खैराचा वृक्ष आहे, चढायला लागलात की इतके काटे बोचतात की तुम्हाला आईचं दूध आठवतं."
ट्रस्ट परिचय
परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी दिलेल्या प्रेरणेनुसार सन २०१३ मध्ये प्रकाश ज्ञानशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेची नोंदणी करण्यात आली. समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नयना करिता ही संस्था सद्गुरु श्री बापट गुरुजींनी आखून दिलेल्या तत्त्वांवर कार्य करते आहे.

ट्रस्ट उपक्रम
विद्यार्थी शिक्षण सहाय्य
बदलापूर, कल्याण तसेच परिसरातील गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी संस्थेमार्फत शैक्षणिक साहाय्य केले जाते.

वैद्यकीय समुपदेशन
साधकांना निर्माण होणाऱ्या वैद्यकीय समस्या आणि त्यावर सुचवलेले वैद्यकीय इलाज ह्याबाबतचे साधकांचे ज्ञान वाढावे, त्यांच्यात मनोबल निर्माण व्हावे ह्या करीता वैद्यक क्षेत्रात जाणकार असलेले वैद्यकीय विभागाचे स्वयंसेवक हा उपक्रम घेतात. ह्यामध्ये भक्तांना त्यांच्या वैद्यकीय समस्यांसंदर्भात विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. आजवर follow-up सह जवळजवळ ६५०-७०० भक्तांनी ह्या सेवेचा लाभ घेतला आहे.

जन्मपूर्व व जन्मोत्तर बाल संस्कार
पुढची पिढी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम, उत्तम संस्कारांनी संस्कारित आणि उत्तम विचारांनी समृद्ध अशी निर्माण व्हावी, म्हणून इच्छुक जोडप्यांसाठी यज्ञामध्ये, दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार घेतले जातात. गेल्या दोन वर्षात ५९७ साधकांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

यज्ञात येणारी लहान मुलं हे उद्याचे नागरिक, उद्याचे साधक आणि उद्याचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्यासाठी यज्ञाच्या दिवशी बालसंस्कार वर्ग घेतले जातात, ज्यामध्ये ह्या मुलांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. १५ ते २० बालसाधक ह्या उपक्रमाचा नित्य लाभ घेत आहेत. त्यामध्ये सूर्यनमस्कार, ध्यान, स्तोत्र, बौद्धिक क्षमता वाढवणारे खेळ, चित्रकला- हस्तकला, यज्ञसाक्षीने सरस्वती मंत्र आणि मेधा स्तोत्राचं पठण तथा हवन घेतले जातात. सध्या विनोबांची गीताई मुलं आवडीने शिकत आहेत.

रक्तदान शिबीर
वैद्यकीय विभागामार्फत घेतला जाणारा अजून एक उपक्रम म्हणजे ठाणे येथील श्री वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने यज्ञ प्रसंगी घेतलं जाणारं रक्तदान शिबीर. आजपर्यंत एकूण पाच शिबिरं संपन्न झाली असून प्रत्येक शिबिरात किमान ६५ ते ७० रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे.

स्वच्छता अभियान
दरवर्षी गणेश विसर्जनानंतर कल्याण येथील गणेश घाटावर स्वच्छता अभियान आयोजित केले जाते. देहबाह्य परिसराची, निस्वार्थ भावनेने स्वच्छता केल्यामुळे अंतर्शुद्धी व्हायला मदत होते असं श्री सद्गरु नेहमी सांगत असत, त्यास अनुसरून हा उपक्रम नित्याने घेतला जातो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ह्या उपक्रमाची लेखी नोंद घेऊन तसे आभार पत्र दिले आहे.