परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”, ह्या सुप्रसिद्ध मंत्राची रचना करणाऱ्या यतिश्रेष्ठ श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या नामाचे अधिष्ठान असलेल्या “नमो गुरवे वासुदेवाय” ह्या मंत्राविषयी जाणून घेण्याअगोदर आपण ह्या यतिश्रेष्ठाच्या कार्याविषयी थोडक्यात ओळख करून घेऊ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगाव ह्या लहानशा गावात, दत्तभक्तीची परंपरा असणाऱ्या सात्त्विक घरात १८५४ साली श्रावण कृष्ण षष्ठी ह्या तिथीवर स्वामी महाराजांचा जन्म झाला. कुशाग्र बुद्धीच्या जोरावर वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी दशग्रंथांचा (चार वेद आणि सहा दर्शनं) अभ्यास पूर्ण केला आणि लोक त्यांना वासुदेव शास्त्री म्हणून ओळखू लागले. ऋषीतुल्य आचरण, शास्त्रांचा सखोल अभ्यास आणि संसारतापाने त्रस्त झालेल्यांविषयी वाटणारी करुणा ह्यामुळे वासुदेव शास्त्रींची कीर्ती तरुणवयापासूनच चोहीकडे होऊ लागली. मुळातल्या वैराग्यपूर्ण वृत्तीला अनुसरून, पत्नीच्या आकस्मिक मृत्युनंतर वयाच्या सदतीसाव्या वर्षी त्यांनी संन्यास धर्म आणि दण्ड ग्रहण केला. त्यानंतर “सर्व भारत खंडात पायीच संचार करून उपदेश करावा, ईश्वरनिष्ठा आणि स्वधर्म निष्ठा जागृत करावी”, हा दत्तप्रभुंचा आदेश शिरोधार्य मानून त्यांनी आसेतु-हिमाचल पदभ्रमण करत अखंड समाज प्रबोधनाचं कार्य अंगिकारलं.
शास्त्रानुसार कुटीचक, बहूदक, हंस आणि परमहंस असे संन्यासाचे अनुक्रमे कनिष्ठ ते श्रेष्ठ असे चार प्रकार आहेत. त्यातल्या परमहंस ह्या सर्वोच्च प्रकारच्या संन्यासाचा स्वीकार केलेल्या स्वामी महाराजांनी आयुष्यभर विहित संन्यासधर्माचं आचरण अत्यंत कठोरतेने केलं. परिव्राजकाचार्य म्हणजे ज्याला कोणतीही मर्यादा नाही, ज्याच्या ज्ञानाला कोणतीही सीमा नाही, जो आकाशाला गवसणी घालू शकेल इतका अमर्याद आहे, तो! परमहंस परिव्राजकाचार्यपदाला पोहोचलेल्या भारतातल्या काही मोजक्या यतिश्रेष्ठांमध्ये वासुदेवानंद सरस्वतींची गणना होते. ह्या पदी पोहोचलेल्या संन्यासाने अखंड ज्ञानदानाचं व्रत स्वीकारायचं असतं. त्याप्रमाणे समाजाला ज्ञानमय करून त्यातल्या प्रत्येकाची उत्क्रांती करण्याच्या दृष्टीने स्वामी महाराजांनी द्वैत-अद्वैताचा मेळ घालणाऱ्या प्रचंड आध्यात्मिक वाङ्मयाची निर्मिती संस्कृत आणि मराठीतून केली. अखंड पदभ्रमणाद्वारे समाजाचा उद्धार आणि पर्वताएवढ्या साहित्याची निर्मिती ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी लीलया साधणाऱ्या वासुदेवानंद सरस्वतींची तुलना अत्यंत सार्थतेने श्रीमत् आद्य शंकराचार्यांशी केली जाते.संस्कृतमधलं श्रीदत्तपुराण, मराठीतलं श्रीदत्तमाहात्म्य, तसंच श्रीसप्तशती गुरुचरित्रसार, द्विसाहस्त्री गुरुचरित्र यासह अनेक ग्रंथ, स्तोत्र, मंत्र, टीका, वार्तिकं, छंदोबद्ध काव्य, अभंग-आरती अशा विविध प्रकारच्या साहित्याचे ते जनक आहेत. बहुतांशी दत्तस्थानांवर म्हटले जाणारे (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र, करुणात्रिपदी, किंवा पालखीची पदं स्वामी महाराजांनी रचलेली आहेत. त्यांनी उत्कटतेने केलेल्या दत्तभक्तीमुळे, अविरत संचाराद्वारे केलेल्या दत्तभक्तीच्या प्रचारामुळे आणि निर्माण केलेल्या दत्तभक्तीपर साहित्य समुद्रामुळे दत्तसंप्रदायाला आजचं संघटित स्वरूप प्राप्त झालं आहे.
दत्तसंप्रदायासाठी त्यांचं आणखी एक अतिशयमहत्त्वाचं योगदान आहे, ज्याचा उल्लेख अपरिहार्य आहे. श्रीदत्तात्रेयांचे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय अवतार मानल्या गेलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्या दोघांचीही जन्मस्थळं आणि त्यांच्या जन्मतिथी विषयीचं निश्चित भाष्य सर्वप्रथम स्वामी महाराजांनी केलं. ह्याविषयी इतिहासकारांमध्येही दुमत नाही.
स्वामी महाराज म्हणजे करुणेचा महासागर होते. त्यांनी रचलेली करुणात्रिपदी म्हणताना रचनाकारात मुळात असलेली असीम करुणा प्रत्येक पदात आविर्भूत झाली आहे. “आचार प्रथमो धर्म:” हे ब्रीद स्वीकारून स्वतःपुरते स्वीकारलेले आचरणाचे नियम कठोरपणे पाळतानासुद्धा, समाजाविषयी वाटणाऱ्या प्रचंड आंतरिक कळकळीपोटी त्यांनी समाजोद्धाराचा आयुष्यभर प्रयत्न केला. त्यासाठी वेळप्रसंगी नियमावलींशी तडजोड केली आणि त्या तडजोडीचं पुढे प्रायश्चित्तही घेतलं! बुद्धीची समता साधलेल्या म्हणजेच सम + ’धी’ अवस्था प्राप्त केलेल्या स्वामी महाराजांनी माणसा-माणसात किंवा साधना मार्गांत कोणताही भेद केला नाही. स+अधु अर्थात अधु माणसाबरोबर चालणारा तो साधू, मग ते अधुत्त्व शरीराचं असो किंवा मनाचं असो, ते दूर करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहणं म्हणजे साधुत्व. असं खरोखरचं साधुत्व स्वामी महाराजांकडे होतं. “सर्व सिद्धी कर: प्रभो” अशी अवस्था असूनही त्यांनी स्वार्थपूर्तीसाठी सिद्धींचा वापर कधीही केला नाही. किंबहुना कर्ममार्गावर त्यांची अढळ निष्ठा होती. स्वामी महाराजांनी हजारो लोकांना प्रापंचिक अडचणी सोडवायला मदत केली असली, तरी त्या प्रत्येकाला त्यांनी ह्याची जाणीव करून दिली की निसर्ग कोणाला काहीही फुकट देत नसतो, निसर्गाचं कर्ज हे प्रत्येकाला कधी ना कधीतरी फेडावंच लागतं. सदऱ्हेतून प्रेरित होऊन केलेल्या निःस्वार्थ सत्कर्माशिवाय मनुष्याला मुक्ती मिळू शकत नाही, ही त्यांची प्रमुख शिकवण आहे. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि योगमार्गाचा उत्कृष्ट मेळ घालून आदर्शवत जीवन जगण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला. आयुर्वेदाचा सखोल अभ्यास असणाऱ्या स्वामीमहाराजांनी कित्येक रोगाईतांना रोगमुक्ती दिली, पण स्वतः मात्र प्राप्त प्रारब्धाचा स्वीकार करून आयुष्यभर मागे लागलेला संग्रहणी सारखा रोग, प्लेग, सर्पदंश अशा सारख्या प्रकृतीच्या तक्रारी दूर केल्या नाहीत. जवळ येणाऱ्या, प्रत्येकाचा लवकरात लवकर उद्धार कसा होईल, ह्याचा विचार करून त्यांनी हजारो लोकांना विविध साधना मार्ग सांगितले. ह्यात स्मार्ताग्नी दीक्षा, श्रौताग्नी दीक्षा, नामस्मरण, मंत्रसाधना असे विविध प्रकार आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेल्यांपैकी दीक्षित महाराज, परभणी इथले गांडा महाराज, इंदौरचे नानामहाराज तराणेकर, पुण्याचे गुळवणी महाराज, नारेश्वरचे रंगावधूत महाराज ह्या शिष्यांनी पुढे महान कार्य केलं.
अत्यंत तपःपूत, निरलस, निराभिमानी आणि प्रसिद्धी पराङ्मुख आयुष्य व्यतीत करून, १९१४ साली आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी स्वामी महाराजांनी नर्मदाकिनारी आपला देह विसर्जित केला आणि हे महनीय चैतन्य दत्तात्रेयनामक वैश्विक शक्तीशी एकरूप झालं. आज ते चेतन त्या दृश्य स्वरूपात उपलब्ध नसलं, तरीसुद्धा ब्रह्मस्वरूप असणारी ही सद्गुरु शक्ती सर्व विश्वाला व्यापून दशांगुळं शिल्लक राहिली आहे. आपलं आयुष्य योग्य मार्गावर आणू इच्छिणाऱ्यांना प्रत्येकाने, ह्या संतश्रेष्ठाच्या चरित्राचा साक्षेपी अभ्यास करून त्यांच्या तपोमय, ज्ञानमय, करुणामय जीवनातून योग्य तो बोध घेतला पाहिजे.
॥ नमो गुरवे वासुदेवाय॥
Close x
हरि: ॐ ॥ नमो गुरवे वासुदेवाय ॥ -- मंत्र साधना
(परम पूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांच्या “नमो गुरवे वासुदेवाय : मंत्र व यंत्र साधना “ ह्या पुस्तकाच्या आधारे)
संपूर्ण विश्वाचा कारभार चालवण्यासाठी जी वैश्विक शक्ती निरनिराळ्या रूपांत प्रकट झाली, तिचंच एक रूप म्हणजे दत्तशक्ती. विश्वारंभी उत्पन्न झालेली ही दत्तशक्ती विविध अवतारांनी प्रकट होऊन प्रत्येक जिज्ञासूपर्यंत सतत ज्ञानाचा प्रवाह पोहोचवते आहे. असाच एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे सन १८५४ ते १९१४ ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय. बाह्यतः कर्मकठोर भासणारं, परंतु अंतर्यामी करुणापूर्ण असलेलं हे दत्तावतरण आजही भक्ताला मृत्यूलोकातून सोडवण्यासाठी त्याच्या मागे पहाडासारखं उभं आहे. अट एकच की भक्ताने प्रापंचिक मागण्यांची कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या शाश्वत कल्याणासाठी त्या सद्गुरुतत्त्वाला अत्यंत आर्ततेने साद घातली पाहिजे.
स्वामी महाराजांची निस्सीम भक्ती करणारे परमपूज्य आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज अर्थात् भाऊ महाराज करंदीकर यांना अंतःप्रेरणेने स्फुरलेलं सद्गुरु नाम म्हणजे ॥ नमो गुरवे वासुदेवाय ॥ त्यांनी स्वतः अनेक साधकांना या नामाची दीक्षा दिली. सन २००३ मध्ये समाधिस्थ होण्याअगोदर ह्या नामाचा १५१ कोटी सामूदायिक जपाचा संकल्प त्यांनी केला होता. अनेक नामजप शिबिरं, नामजप यज्ञ आणि नामस्मरण कार्यक्रमांमध्ये झालेल्या हवन, मार्जन आणि अर्चनानंतर हा जपसंकल्प त्यांचे पश्चात सन २००८ मध्ये पूर्ण झाला. अर्थात् ह्या सद्गुरुनामाला आता मंत्रस्वरूप प्राप्त झालं आहे. विशेष असं, की कोणत्याही श्रद्धावान साधकाला ह्या मंत्राचं संकल्पयुक्त पठण करण्याची मुभा आहे. या मंत्रसाधनेसाठी जात-धर्म-लिंग-पंथ अथवा अन्य कोणतंही तत्सम बंधन नाही, किंबहुना साधक टेंबे स्वामी महाराजांच्या गुरुपरंपरेतलाच हवा असाही आग्रह नाही. कोणत्याही गुरुपरंपरेतला साधक सगुण सद्गुरुंच्या आज्ञेने ह्या मंत्राची सिद्धी प्राप्त करू शकेल, कारण हा मंत्र सर्वव्यापी सद्गुरुतत्त्वाला उद्देशून रचला गेला आहे.
नमो गुरवे वासुदेवाय
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज हे स्वतः एक मंत्रद्रष्टा महापुरुष होते. अनेकांना त्यांनी निर्माण केलेले मंत्र माहीत असतील, परंतु त्या मंत्रांचे रचनाकार स्वामी महाराज आहेत हे माहीत नसेल. उदाहरणार्थ, ’दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ हा मंत्र स्वामी महाराजांनी निर्माण केला आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल. ह्या मंत्रद्रष्ट्या दत्तावतारी पुरुषाची शक्ती ज्यात सामावलेली आहे, तो हा ’नमो गुरवे वासुदेवाय’ मंत्र! ह्या मंत्रातला पहिला शब्द आहे नमो, म्हणजे नमः. ही ह्या मंत्रातली शक्ती आहे. सद्गुरु आपला पाठीराखा आहे, हे सत्य जाणण्यात होणारा आनंद ‘नमः’ या शब्दाने प्रकट होतो. ’नमो ‘ किंवा नमस्काराला अनेक अर्थ आहेत. शिष्टाचार पाळण्यासाठी केलेला नमस्कार, ’देखल्या देवा दंडवत‘ म्हणत केलेला औपचारिक नमस्कार किंवा काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी एखाद्याला केलेला जुलुमाचा नमस्कार, असा कोणताही नमस्कार इथे अपेक्षित नाही; तर सद्गुरुंसमोर नतमस्तक होऊन मनापासून केलेला शिरसाष्टांग नमस्कार इथे अपेक्षित आहे. ज्याला आपण नमस्कार करतो आहोत त्या इष्ट प्रतीकावर किंवा त्याच्या निर्गुण रूपावर चित्त शांत आणि एकाग्र होणं अपेक्षित आहे. ‘सगुणापुढे नतमस्तक झाल्याशिवाय त्यातल्या निर्गुणापर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून मी त्या सगुणाला नमस्कार करतो आहे’ ही ज्ञानयुक्त भक्ती इथे महत्त्वाची आहे. “ ब्रह्मतत्त्वाचं साक्षात अवतरण ह्या रूपामध्ये झालं आहे म्हणून मी त्याला नमस्कार करतो” असं म्हणत अहंकारशून्य होऊन शरणागतीपूर्वक नमस्कार करणं ही भक्ताची एक प्रकारची शक्ती असते. नतमस्तक भावाने केलेल्या नमस्काराने ही शक्ती जागृत होते. जो जो भक्त हा अर्थ जाणून एकाग्रतापूर्वक आणि नमनपूर्वक ह्या मंत्राचं पठण करील, त्या त्या भक्ताची ही शक्ती जागृत होईल.
नमन ही या मंत्रातली शक्ती आहे, तर वासुदेव हा यातला कीलक आहे. कित्येक जन्मांच्या पुनरावृत्तीनंतर एखाद्या जाड बुंध्याच्या वृक्षाप्रमाणे आपली जन्मजन्मांतरीची पापं गोळा झालेली असतात. कर्मांचा हा जाड बुंधा कापल्याखेरीज त्याच्या फळांपासून आपली सुटका नसते. परंतु होतं काय, की कितीही साधना केली तरी जीवनातल्या आपल्या निरनिराळ्या आसक्तींमुळे हा बुंधा एकाच जन्मात पूर्णपणे कापला जात नाही. अशावेळी भक्ताच्या प्रयत्नांना संरक्षण देण्याचं, त्याच्या यशपूर्तीला गती देण्याचं काम कीलकामुळे शक्य होतं. ‘नमो गुरवे वासुदेवाय’ ह्या मंत्रातील वासुदेवाय ह्या कीलकामुळे जणू पाचरीचं काम होतं. लाकूड तोडताना पाचर मारून लाकडाला खाच पाडतात. ज्याप्रमाणे पाचर लाकडाचा भेद करते, त्याचप्रमाणे कर्माचे तुकडे करण्याचं काम ही वासुदेव नामक पाचर करते.
’वासुदेव‘ ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे वसुदेवाचा पुत्र. परंतु ह्या शब्दाचे इतरही अनेक गूढार्थ आहेत. त्यांपैकी एक म्हणजे “वसुनि अंतःकरणे दिव्यतिः”, अर्थात् जो सर्व जीवांच्या अंतःकरणात प्रकाशमान झालेला आहे, असा तो म्हणजे वासुदेव. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि वस्तूला जो प्रकाशित करतो, अज्ञानाचा अंधःकार घालवण्याचा प्रयत्न करतो, तो हा वासुदेव. प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असलेल्या ह्या वासुदेव नामक परमात्याला नमस्कार करायचा आहे. ‘सर्व विश्वाला दशांगुळे व्यापून उरलेल्या वासुदेवाला माझा नमस्कार असो’, ही भावना इथे अभिप्रेत आहे. ‘सद्गुरुंच्या देहामध्ये जे साक्षात परब्रह्म विराजमान आहे, त्याला माझा नमस्कार असो’ ही भावना जोपर्यंत दृढ होत नाही, तोपर्यंत अज्ञानाचा अंधःकार दूर होऊ शकत नाही. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती नामक देहामध्ये अवतरित होऊन कार्य करणारं ब्रह्मतत्त्व म्हणजेच हा वासुदेव आणि विशेष म्हणजे त्या देहाचं नावही वासुदेव! अशा त्या सगुणाद्वारे अवतरित होणार्या परब्रह्मस्वरूप वासुदेवाला ह्या मंत्राद्वारे वारंवार नमन घडणं अपेक्षित आहे.
विष्णुसहस्त्रनामावरील शांकरभाष्यात ‘वासुदेव’ शब्दाचे इतरही अनेक अर्थ उलगडून सांगितले आहेत, ते देखील जिज्ञासूंनी जरूर अभ्यासावेत. त्यांनी सांगितलेला ‘’वासु’’ ह्या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे प्रत्येकाला आच्छादित करणारा, पांघरुण घालणारा. तेव्हा सारांशाने ह्या शब्दाचा संकुल अर्थ असा, की आश्रयाला येणाऱ्या प्रत्येकाला आच्छादणारा आणि सर्वांना ज्ञानाने प्रकाशित करून त्यांना अध्यात्मासाठी उद्युक्त करणारा, असा तो वासुदेव. जेव्हा ह्या शब्दामागे गुरवे हा शब्द जोडला जातो तेव्हा त्या वासुदेव नामक परमात्म्याच्या गुरुरूपाला आपण नमस्कार करत असतो. गुरवे हा शब्द म्हणजे ह्या मंत्राचं बीज आहे. ह्या शब्दाद्वारे साक्षात दत्तात्रेयांना किंवा सद्गुरुतत्त्वाविषयी आपली जी कोणती कल्पना असेल, त्या कल्पनेला आपण नमस्कार करत असतो. विश्वाच्या मागे जी पालकशक्ती आहे, त्या शक्तीला तो नमस्कार असतो. आपण त्या सद्गुरुशक्तीला वासुदेव असं नाम दिलं एवढंच. जसं भात ह्या पदार्थाला हिंदीमध्ये कोणी चावल म्हणतं, मल्याळीमध्ये कोणी चोर म्हणतं तर कानडीमध्ये कोणी अन्न म्हणतं. शब्द वेगवेगळे असले, तरी अर्थ एकच असतो, … भात ! म्हणून कोणी ह्या शब्दाला ’मी ज्याची भक्ती करतो, तोच फक्त हा वासुदेव आहे, हा फक्त माझाच गुरु आहे’’ इ. इ. कोणतीही मर्यादा घालणं अपेक्षित नाही. हा वासुदेव साक्षात ब्रह्मतत्त्व आहे, साक्षात जगद्गुरु आहे.
तात्पर्य असं, की नमः ही भक्ताची शक्ती, वासुदेव हे कीलक आणि गुरवे हे बीज अशी त्रिपुटी ह्या मंत्रात सिद्ध आहे. नमो गुरवे वासुदेवाय हा मंत्र कोणी सोम्यागोम्याने सांगून रचलेला नाही, तर त्यात प्रत्यक्ष सद्गुरुशक्ती विराजमान आहे आणि म्हणूनच त्यात प्रचंड सामर्थ्य आहे. हा मंत्र उच्चारताना प्रमुख अट एकच आहे, ती म्हणजे शरणागत मनाने सद्गुरुतत्त्वाशी नव्वद अंशाचा कोन साधणं. असा कोन साधला तरच शक्तीचं संक्रमण होईल, तेव्हाच प्रत्येक पठणाबरोबर कर्मनिष्कृतीचं काम होईल आणि सद्गुरुतत्त्व तुमच्या पाठीशी पहाडासारखं उभं राहील. त्यासाठी ‘’मी त्या सर्वशक्तिशाली सद्गुरुतत्त्वाला नमस्कार करतो आहे, मी त्याला पूर्णपणे शरणागत आहे,’’ ही भावना अधिक महत्त्वाची आहे.
आपल्या जीवनाचं सारथ्य शरणागतीपूर्वक थेट आपल्या सद्गुरुंकडे सोपवावं, मग तो सद्गुरु आपल्याला जीवनसागर पार करून थेट मुक्तीच्या पैलतीरी घेऊन जाईल, हे निश्चित. मग मधल्या काळात आपल्याला कोणत्याही इतर सिद्धींची आवश्यकताच भासणार नाही. वासुदेवरूपी सद्गुरुंनी आपल्याला मुक्तीच्या पैलतीरी न्यावं यासाठीच केवळ ह्या मंत्राने त्यांना नमन करणं अपेक्षित आहे,… नमो गुरवे वासुदेवाय!!!
नामसंकीर्तनाला अथवा मंत्रसाधनेला जर विशिष्ट अशी यंत्रसाधनेची जोड देता आली, तर नामशक्तीच्या व मंत्रशक्तीच्या सुपरिणामांना विशिष्ट गती, विशिष्ट दिशा मिळते. त्याच दृष्टीने ‘नमो गुरवे वासुदेवाय’ ह्या मंत्राच्या सिद्धीसाठी श्रीगुरु वासुदेव यंत्राची निर्मितीही करण्यात आली आहे.
Close x
॥ श्रीगुरु वासुदेव यंत्र ॥
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीमद् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक २७ डिसेंबर २०१२ रोजी, श्रीदत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी यांनी श्रीगुरु वासुदेव यंत्राचे विमोचन केले. मंत्रसाधनेला यंत्रसाधनेची जोड दिली तर त्यातून निर्माण होणारी प्रचंड आध्यात्मिक शक्ती साधकाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या किंबहुना संपूर्ण विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयुक्त ठरेल या भव्य हेतूने श्री गुरुजींनी हे यंत्र सर्व साधकांना उपलब्ध करून दिले आहे. ’नमो गुरवे वासुदेवाय’ हा सिद्ध मंत्र गुंफलेले हे यंत्र म्हणजे गुरुपरंपरेतील सर्व साधकांना भुक्ती आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारी गुरुकिल्लीच आहे! स्वामी महाराजांची निस्सीम भक्ती करणारे परमपूज्य सद्गुरु श्री भाऊमहाराज करंदीकर यांनी हा नामजप सर्वप्रथम भक्तांना दिला. या नामजपाचा १५१ कोटी जपसंख्येचा संकल्प त्यांचेनंतर परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी भक्तांकडून आवश्यक त्या हवन, मार्जन व अर्चनासह सन २००८ मध्ये पूर्ण करून घेतला. या संकल्पपूर्ती नंतर या नामाला सिद्धमंत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नमः अर्थात नमन ही भक्ताची शक्ती, वासुदेव हे कीलक आणि गुरवे हे बीज अशी त्रिपुटी या मंत्रात सिद्ध आहे. या मंत्रातून निर्माण होणार्या शक्तीला योग्य दिशा देऊन, या शक्तीचे संनियंत्रण करण्याचे कार्य यंत्राद्वारे केले जाते. यंत्रशास्त्राच्या नियमांना अनुसरून बिंदू, वर्तुळ, त्रिकोण, कमलदल आणि चौकोन ह्या भौमितीय आकारांची विशिष्ट संरचना यात असून, यंत्राच्या केंद्रस्थानी ॐकार आहे. विश्वाची उत्पत्ती आणि अंत सूचित करणारा हा ॐकार, शक्तीदर्शक अधोमुखी त्रिकोणात संपुटित झाला आहे. यंत्राच्या ह्या मूळ गाभ्याभोवती ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी त्रिकोणांची एकरूप झालेली रचना आहे. या संरचनेमुळे निर्माण झालेले सहा उपत्रिकोण आणि मुळातले तीन त्रिकोण, असे एकूण नऊ त्रिकोण यंत्रात सामावलेले आहेत. या नऊ त्रिकोणातून पंचमहाभूतं आणि मन-बुद्धी-चित्त-अहंकार हे अंतःकरणाचे चार प्रकार अभिव्यक्त होतात. या संरचनेच्या बाह्य दिशेने असणारे वर्तुळ विश्वाची चक्राकार गती दर्शवते तर दहा पाकळ्यांचं पद्मदल दशेंद्रियांचा निर्देश करते. यंत्रशास्त्रानुसार पद्मदळ हे सृजनाचे प्रतीक आहे. या पद्मदलात नमो गुरवे वासुदेवाय ही अक्षरे गुंफण्यात आली आहेत. सर्वात बाह्य दिशेने असणार्या चौकोनाला चार द्वारे आहेत. याला यंत्रशास्त्रात भुपूर असे म्हणतात.
बहुभूज आकारांमधला सगळ्यात लहान आकार असलेला चौकोन हे बहुउद्देशीय सृजनाचं प्रतीक आहे. यंत्रातल्या विविध आकारांसाठी रंगसंगतीचं नियोजनही अत्यंत विचारपूर्वक केले आहे, उदाहरणार्थ लालसर गुलाबी रंग श्री-तत्त्व दर्शवतो तर निळा आणि पिवळा रंग अनुक्रमे धैर्य आणि शांती दर्शवतात. हिरवा रंग हा सफलतेचं, पुष्टीचं प्रतीक आहे. ह्या यंत्रावर एकाग्रता केल्याने साधकाला इह आणि पारलौकिक समृद्धीची प्रेरणा मिळते आणि साधक शाश्वत अभ्युदयाकडे वाटचाल करतो.
सद्गुरुंतत्त्वाचं सामर्थ्य प्रदान करणारे श्रीदत्तात्रेय यंत्र आणि तंत्रशास्त्रात अंतर्भूत असलेलं बगलामुखी यंत्र अशी दोन्ही यंत्र ह्या यंत्रामध्ये गुप्तरीत्या गुंफली आहेत. त्यामुळे ह्या एकाच यंत्रावर भक्तीपूर्वक एकाग्रता केल्यास किंवा यंत्रसाक्षीने मंत्रजप केल्यास वासुदेवरूपी श्रीदत्तात्रेय आपल्या सर्वशक्तींसह साधकाच्या मागे पहाडासारखे उभे राहून साधनेआड येणार्या सर्व आंतर्बाह्य शत्रूंचा बिमोड करतील ह्यात शंका नाही.
सारांशाने ह्या यंत्रातून निर्माण होणारी शक्ती जशी प्रेरक असेल तशी ती रक्षकही असेल. साधनेतून लवकर फलनिष्पत्ती प्राप्त होण्यासाठी साधकाने नाममंत्राच्या प्रत्येक आवर्तनाबरोबर स्वामी महाराजांचे आणि सद्गुरुतत्त्वाचे स्मरण करणे अपेक्षित आहे. ही साधना करण्यासाठीची प्रमुख अट म्हणजे हा मंत्र म्हणण्याचा आणि यंत्रसाधना करण्याचा आदेश सगुण सद्गुरुंकडून साधकाला मिळाला पाहिजे. ही साधना करण्यासाठी अन्य कसलेही बंधन नाही. कोणत्याही जाती-धर्म-लिंग-पंथाचा साधक सश्रद्ध भावाने आणि ज्ञानपूर्वक केलेल्या संकल्पाने ही यंत्र साधना करू शकतो.
Close x
ll SHRI ll
|| Shri Guru Vasudev Yantra ||
On the auspicious occasion of Shri Datta Jayanti dated 27thDec2012, Param Poojya Sadguru Shri Bapat Guruji released ‘Shri Guru Vasudev Yantra’ with the divine blessings of Shripad ShriVallabha, Shrimad Narasimha Saraswati Swami Maharaj and Paramhansa Parivrajakacharya Shrimat Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj. Deep meditation on this Yantra alongwith the simultaneous chanting of “Namo Gurave Vasudevay” mantra has a huge potential of generating tremendous spiritual energy. This energy shall be useful for the betterment of not only the individual devotee, a society or a nation, but it will also help in achieving the complete welfare of the entire universe. With these noble intentions, Shri Guruji has given this Yantra sadhana to all the devotees. The powerful siddha mantra `Namo Gurave Vasudevay’ has been beautifully embedded into this yantra and together they form a master key that opens up the spiritual path of bhukti (worldly fulfillment) and mukti (liberation).
It was Poojya Sadguru Shri Bhau Maharaj Karandikar a Siddha and a prominent devotee of P.P. Shrimat Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj, who initially gave this Naam Jap sadhana (chanting the name of the Lord) to the devotees. His spiritual resolution of 151 crores chanting of Naam Jap was later achieved under the spiritual guidance of Parampoojya Sadguru Shri Bapat Guruji, after Poojya Shri Karandikar Maharaj left for the heavenly abode in the year 2004. Shri Guruji inspired the devotees to complete the resolution by chanting the Naam Jap in groups and also through the Jap offerings made to the Yadnya (sacrificial fire). Now the Naamjap has attained the status of a siddha (i.e. proven to be effective) mantra.
‘Namaha’ is the power of a devotee’s surrender, ‘Vasudev’ is the wedge which helps in felling the tree of his bad karma (bad deeds) and ‘Guravey’ is the divine seed (beej) that adds to the potency of the mantra. This completes the trinity required for any group of words to attain the status of a mantra according to the ancient Indian spiritual laws. The Yantra regulates and monitors the flow of energy that is generated while chanting the mantra with concentration. The Yantra has been carefully designed by Shri Guruji after critically studying the ancient yantra shastra (the yantra science). It is complete with various geometrical figures such as a point, circle, triangle, lotus and a square. The ॐkar (Omkar) which is the central feature of this yantra, simultaneously indicates the origin and the end of this universe and has been encapsulated in a triangle. On the outer side of this triangle are two opposite congruent triangles that further create a set of six sub-triangles. Thus in all, nine triangles are included in this yantra. The nine triangles symbolically indicate the five elements (fire, earth, wind, space and water) and four types of conscience viz. mind, memory, intellect, and ego. This symbol is encircled by a circle on the exterior which points to the circular motion of this universe. The ten petals of the lotus are indicative of the ten senses (five senses of knowledge and five senses of action). As per the yantra shastra (science of yantra), Padmadal (lotus) is a symbol of creation. Every single petal of the lotus is ingrained with a single letter of the ten lettered mantra. The square that exists in the exterior has four symbolic exits and it is called ‘bhupoor’ according to the yantra shastra. Although a square is the smallest polygon in geometry, it is also a symbol of multifarious creativity. The colour scheme for the yantra also has much significance. The reddish-pink colour represents the ‘Shree’ i:e Laxmi, Goddess of wealth whereas, blue and yellow represents courage and peace respectively. Green colour represents abundance and welfare. A deep concentration on this yantra will inspire a devotee to uplift himself towards everlasting prosperity in both, the material and spiritual worlds.
Two ancient Yantras i:e Shri Dattatreya Yantra and Shri Bagalamukhi Yantra have also been secretly embedded in Shri Guru Vasudev Yantra. Shri Dattatreya Yantra indicates the strength of the Sadgurutattva. Thus when a devotee concentrates on this yantra or chants a mantra in its presence, he is assured that Lord Dattatreya in the form of the omnipotent ‘Vasudeva’ will undoubtedly protect the devotees against all the negativity and obstacles that may befall him while traversing the spiritual path. To conclude, the Yantra is not only capable of inspiring the seeker but is also capable of protecting him in the true sense. To get early results, every devotee who chants the mantra in presence of the yantra is expected to meditate on the wordly form of P.P. Shrimat Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj and the formless Sadgurutattva. The essential pre-requisite of doing this sadhana is that a devotee should receive the sadhana from his Sadguru (spiritual teacher). A devotee belonging to any caste, creed, sect, religion or gender can perform this sadhana with full faith and knowledge.
Parampoojya Shri Sadguru successfully completed the resolution of completing the 101 crores naamajapa of the ‘Namo Guravey Vasudevay’ in the year 2014 which marked the Samadhi centenary year of P.P. Shrimat Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj. Further Namjap resolutions of 25 crores, 11 crores were also completed. Till the end of 2017, this naamjap has been chanted for more than 2.75 crore times by devotees thus making it complete with spiritual power and energy.
Close x
नमो गुरवे वासुदेवाय
पूर्ण झालेले जप संकल्प
• सन २००८ मध्ये १५१ कोटी जप संकल्प; हवन, अर्चन, मार्जनासह पूर्ण झाला
• सन २०१४ मध्ये श्री स्वामी महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त १०१ कोटी जपसंकल्प पूर्ण झाला
• सन २०१५ मध्ये दत्तजयंतीच्या शुभ मुहूर्तावर खोपोली येथील मूर्ती स्थानाला २५ वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने २५ कोटीचा नामजप संकल्प पूर्ण झाला
• सन २०१७ मध्ये दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ११ कोटी नामजप संकल्प पूर्ण झाला
• सन २०१८ मध्ये सुमारे १.२५ कोटी हून अधिक जप-ध्यान संकल्प पूर्ण झाला आगामी संकल्प
नमो गुरवे वासुदेवाय ध्यान-संकल्प-2019
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजींच्या पाचव्या पुण्यस्मरण वर्षाच्या निमित्ताने श्री सद्गुरूंचे स्मरण आणि त्यांच्या प्रती यज्ञ साक्षीने कृतज्ञता अर्पण करून एक ज्ञानयुक्त संकल्प पूज्य आईंच्या सूचनेनुसार सर्व भक्तांनी डिसेंबर २०१९ च्या यज्ञ साक्षीने केला.
परमपूज्य सद्गुरुंनी “नमो गुरवे वासुदेवाय” ह्या नामाची कोट्यवधी आवर्तनं करून घेतली. त्याच बरोबर हवन, अर्चन आणि मार्जनही करवून घेतलं. ह्या मंत्राची शक्ती गुणाकाराने साधकांना मिळावी ह्यासाठी अंतः स्फूर्तीने आणि ईश्वरी प्रेरणेने त्यांना स्फुरलेलं यंत्र म्हणजे “श्रीगुरु वासुदेव यंत्र”, जे त्यांनी साधनेसाठी उपलब्ध करून दिलं. ही मंत्र –यंत्र साधना म्हणजे गुरुशक्ती मिळवण्यासाठीची जणू एक गुरुकिल्लीच आहे आणि ही गुरुकिल्ली त्यांनी प्रत्येकाला उपलब्ध करून दिली आहे. आता एकाग्रतापूर्वक ती साधना करून त्याद्वारे शक्तीची जागृती आणि ग्रहण करायचे आहे.
आतापर्यंत १५० कोटी, १०१ कोटी, २५ कोटी, ११ कोटी असे विशिष्ट संख्यापूर्ती साधून देणारे जपसंकल्प पूर्ण झाले.तत्पूर्वी परमपूज्य भाऊ महाराजांच्या प्रेरणेने सुद्धा अनेक संकल्प केले गेले. गेल्या वर्षी जप-ध्यान संकल्प करून १ कोटी २५ लक्ष पेक्षा अधिक जप संकल्पात सहभाग घेतलेल्या प्रत्येकाच्या वतीने १७ नोव्हेंबर २०१९ ह्या दिवशी आळंदी येथील यज्ञात अर्पण झाला. ह्यामध्ये सर्वांनी एका जागी बसून, यंत्रावर एकाग्रता साधत ‘नमो गुरवे वासुदेवाय’ हा ध्यानजप माळेवर केला. ज्याला जितका जप रोज करणं शक्य आहे, तेवढा जपसंकल्प करून तो यज्ञेश्वर नारायणाला अर्पण केला.
ह्या वर्षी सुद्धा तसाच नाम-जप ध्यान संकल्प केला आहे. त्यात फक्त अजून एक जोड पूज्य आईंच्या सूचनेनुसार दिली आहे ती म्हणजे गायत्री मंत्राची जोड. पूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींनी यज्ञ संकल्पाची सुरुवातच मुळात ८४ गायत्री यज्ञाच्या संकल्पाने केली. त्यानंतरही त्यांनी अनेक जणांकडून यज्ञ साक्षीने गायत्री संकल्प पूर्ण करवून घेतला. दर वर्षी पितृयज्ञामध्ये आपण पूर्वजांना कृतज्ञता आणि श्रद्धा अर्पण करण्यासाठी गायत्री मंत्राचा संकल्प श्री सद्गुरू आज्ञेनुसार करत असतो.
आध्यात्मिक उन्नती साठी असलेलं गायत्री मंत्राचं माहात्म्य श्री सद्गुरुंनी अनेक प्रसंगी आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. त्यातलं विज्ञान सुद्धा स्पष्ट केलं आहे. चोवीस अक्षर समुहाचा हा मंत्र म्हणजे “|| तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही, धियो यो न: प्रचोदयात् ||
ह्या मधलं प्रत्येक अक्षर आपल्या एकेका गुणसूत्रावर आघात करतं आणि त्यामुळे त्या गुणसूत्रावर उत्तम संस्कार घडायला सुरुवात होते. समर्थ रामदासांसारख्या अनेक संत –विभूतींच्या अध्यात्मिक कार्याची सुरुवात गायत्री पुरश्चरणाने झाली आहे. स्वतः श्री सद्गुरुंनी गायत्री मंत्र सिद्ध केला होता.
तेव्हा ह्या अमोघ मंत्राच्या जपाची जोड नमो गुरवे वासुदेवाय ह्या ध्यान-जपाला द्यायची आहे.
ह्या संकल्पाच्या सूचना अशा आहेत.
१.प्रत्येक साधकाने रोजची एखादी विशिष्ट वेळ आणि विशिष्ट जागा निवडावी. शक्यतोवर ह्या वेळी आणि त्याच जागेवर बसून मंत्र-यंत्र ध्यानजप करावा.
२.किमान पंधरा मिनिटे किंवा जास्तीत जास्तीत किती काळ आपण दररोज साधनेसाठी बसू शकता ह्याचा प्रत्येकाने अंदाज घावा आणि त्यानंतर तेवढ्या वेळेमध्ये आपण सावकाश आणि एकाग्रतापूर्वक किती माळा करू शकता ह्याचाही अंदाज स्वतःचा स्वतः घ्यावा. त्यानुसार तेवढ्या माळांचा संकल्प आज आपण इथे नोंदवणार आहोत. counter वरती जपाची नोंद वही ठेवली आहे. आजचा संकल्प त्यात नोंदवून त्यानंतर दर महिन्याचा यज्ञाला आपण आपल्या जपाची त्यात नोंद घेणार आहोत.
३.नमो गुरवे वासुदेवाय ह्या जपाला किमान एक माळ गायत्री मंत्राची जोड आपल्याला द्यायची आहे. एकापेक्षा अधिक माळांचा गायत्री संकल्प केला तरी हरकत नाही, मात्र केलेला संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे.
४.पितृ यज्ञामध्ये जो गायत्रीचा किंवा नमो गुरवे वासुदेवाय ह्या जपाचा संकल्प केला असेल त्या व्यतिरिक्त हा संकल्प आहे, जो पुढील वर्षी नोव्हेंबर २०२० च्या यज्ञात आपण अर्पण करणार आहोत.
हा संकल्प प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचा आहे. ह्या संकल्पात सहभागी होण्यासाठी कोणालाही आग्रह नाही, गुरुजींच्या तत्त्वाप्रमाणे “ निमंत्रण सर्वांना आग्रह कोणालाही नाही”. गुरुजींनी अनेक विवेचने नामावर घेतली आणि प्रत्येकाला संकल्प पूर्ती साठी नेहमी प्रोत्साहित केलं. त्यामुळे संकल्प आपणच करायचा आणि तो पूर्ण करायची जबाबदारी पण आपणच घ्यायची आहे. अर्थात एकदा संकल्प झाल्यावर हा संकल्प श्री सद्गुरू आपल्याकडून निश्चितपणे पूर्ण करवून घेतीलच ही खात्री बाळगायला हरकत नाही. फक्त त्यासाठी आपण अत्यंत निष्ठेने, एकाग्र होऊन, एकत्रितपणे आणि अत्यंत शरणागत भावाने हा संकल्प मनोमन करायचा आहे आणि दर महिन्यातल्या जपाची नोंद करायची आहे.