आजच्या ह्या गणेश यज्ञाच्या निमित्ताने, त्या संकल्पपूर्तीची २१ वर्ष आपण साजरी करत आहोत.
प्रथमत: यज्ञ कार्यक्रमाला सुरुवात झाली, ती सद्गुरुंचे ज्ञानगुरु स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रेरणेने आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज, ह्यांच्या आशीर्वादाने. स्वामी विज्ञानानंदांनी त्या काळात प्रकाशशक्तीवर काही अभ्यास केला होता. त्यातलं ज्ञान आणि त्याची उपयुक्तता पटल्यावर सर्वांच्या हितासाठी ते कृतीत उतरवणेही आवश्यक होते, तरच त्या ज्ञानाचा उपयोग होणार होता. सौ आईसाहेबांनी मार्च १९९४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि तद्नंतर एका आठवड्यातच श्री सद्गुरुंनी जात-पात,धर्म -लिंग भेदरहित असा सामुहिक १०८ यज्ञांचा संकल्प केला. त्या मूळ संकल्पाचं प्रगटीकरण आजपर्यंतच्या सुमारे ३५० यज्ञांमध्ये झालं आहे, शिवाय ह्या यज्ञसंकल्पाचा विस्तार दर यज्ञागणिक उत्तरोत्तर वाढतोच आहे. श्री सद्गुरुंच्या ह्या संकल्पात सौ. आईसाहेबांचं योगदान अमूल्य आहे.
सुरुवातीच्या काळात ३०-३५ एवढ्या मोजक्याच मंडळीनी एकत्र येऊन सामूहिक यज्ञाचा श्रीगणेशा श्री गुरुजींनी केला आणि दरमहा यज्ञाचं आयोजन सुरु झालं. "आमंत्रण सर्वांना, पण आग्रह मात्र कोणालाही नाही,"ह्या ब्रीदानुसार २१ वर्ष चाललेल्या ह्या शिस्तबद्ध उपक्रमाचा लाभ, सवंग लोकप्रियतेच्या कोणत्याही मार्गाचा कधीही अवलंब न करता देखील आज जवळ जवळ हजारो साधकांनी घेतला आहे. कधीतरी येऊन सोयीनुसार तप करणाऱ्यांपेक्षाही नियमिततेने संकल्प पार पाडणार्यांची संख्या त्यात जास्त आहे, हे विशेष.
श्री सद्गुरुंना त्यांच्या जात-पात-लिंग भेदरहित यज्ञ प्रसारासाठी जसे अनुमोदक मिळाले, तसेच काही कर्मठ विरोधकही भेटले कारण त्यांचे व्यापक आणि सर्वसमावेशक विचार सर्वांच्याच पचनी पडायचे असं नाही. तरीही, कोणतीही तडजोड न करता स्वत: स्वीकारलेल्या तत्त्वांवर ठाम राहून श्री सद्गुरुंनी यज्ञ चालू ठेवले. आजही श्री सद्गुरुंनी ही तत्त्वे कायम ठेवली आहेत, ज्याचा आपल्या सर्वांना लाभ झाला आहे.
गेल्या २१ वर्षांमध्ये, नियमिततेने होणाऱ्या दरमहाच्या संकल्प यज्ञाबरोबरच ३ ते ७ दिवसांच्या वार्षिक यज्ञाचे तपवर्तुळही आपल्याकडून श्री सद्गुरुंनी पूर्ण करवून घेतले. भारतातील विविध तीर्थक्षेत्री, जसे की बडोदा, मिरज, मडगाव, जळगाव, पेण, गणपतीपुळे मंदिर, कोळीसरे केशव मंदिर, गुहागर दुर्गादेवी मंदिर, व्याडेश्वर मंदिर, हेदवी गणेश मंदिर (जिथे सद्गुरुंनी स्वत: प्रथम ब्रह्मणस्पती सूक्ताचं पठण केलं), वेळणेश्वर महादेव मंदिर, जेथे मच्छिंदनाथांनी यज्ञ घेतला होता ते अडिवर्याचं महाकाली मंदिर, आंबेजोगाई मंदिर,हरिद्वार, चित्रकूट, नैमिषारण्य, पुष्कर, इत्यादी ठिकाणी यज्ञ झाले. त्या तपवर्तुळालाच पूरक असं महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांवर घेतलेलं शक्तीस्वाहाकाराचं तपवर्तुळही सन.२०१४ च्या जाने.मध्ये पूर्ण झालं. सन २००४ पासून अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या वार्षिक यज्ञाच्या ७ वर्षांची तपपूर्ती ज्याद्वारे झाली, ती नर्मदा परिक्रमा, म्हणजे त्या सर्व तपवर्तुळांतलं सर्वोच्च वर्तुळ होतं.
श्रीनर्मदा परिक्रमेच्या तपपूर्तीच्या निमित्ताने श्री सद्गुरुंनी केलेल्या विवेचनामध्ये त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं ज्ञान आपल्याला दिलं होतं. ते म्हणजे तपवर्तुळातून निर्माण होणारी शक्ती वर्तुळे. एकातून एक निर्माण होणारी ही तपवर्तुळे जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा त्या प्रत्येक वर्तुळाच्या पूर्तीनंतर साधकाचं एक पाऊल पुढेच पडलेलं असतं, असं निसर्गाचा हा सिद्धांत सांगतो.
गेल्या महिन्यातल्या यज्ञामध्ये नर्मदा परिक्रमेवरच्या ‘श्री नर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा’ ह्या ग्रंथाचं आणि परिक्रमेच्या सी. डी. चं अनावरण झालं. वार्षिक यज्ञावरील ग्रंथांपैकी प्रसिद्ध झालेला हा पहिलाच ग्रंथ आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ वर्षांच्या तपवर्तुळाची पूर्ती ह्या ग्रंथाद्वारे झाली आहे, किंबहुना, निसर्गचक्रानुसार, पुढे प्रसिद्ध होणाऱ्या मोठ्या ग्रंथांच्या प्रकाशनांची नांदी नर्मदा परिक्रमेवरच्या ह्या ग्रंथाने झाली आहे ! मूल्य अदा करून करण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जाहीरातबाजीचा अवलंब न करतादेखील ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपत आली असून लवकरच दुसरी आवृत्ती काढण्यात येत आहे. ह्या ग्रंथाच्या लोकप्रियतेचं नि;संदिग्ध कारण म्हणजे त्यात समाविष्ट असलेली श्री सद्गुरुंची परिक्रमेवरील अभ्यासपूर्ण १७ विवेचने.
पूज्य श्री प्रतापे महाराजांनी ह्या ग्रंथाच्या विमोचनाप्रसंगी उद्गार काढले होते की, ‘एवढी वर्ष मी सर्वांना नर्मदा परिक्रमा करा असे सांगतो आहे, पण ती का करावी ह्या प्रश्नाला माझ्याकडे नेमकं उत्तर नव्हतं. आता परिक्रमेला येणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना मला उत्तर देता येईल! ’ हे उद्गार अतिशय सार्थ आणि प्रातिनिधिक आहेत. श्री नर्मदाप्रसादजींनी देखील आपल्या दोन शब्दांमध्ये प्रांजळपणे सांगितलं की, ‘मीसुद्धा श्रीनर्मदा परिक्रमेवर ३ पुस्तकं लिहिली आहेत, पण ह्या ग्रंथात जे ज्ञान आहे ते माझ्याच काय, पण नर्मदेवरच्या इतर कोणत्याही मराठी अथवा अन्य भाषेतील पुस्तकात नाही.’ ह्या ग्रंथात असलेलं ज्ञान नर्मदा भक्तच नव्हे, तर आध्यात्मिक क्षेत्रात गम्य असणाऱ्या सर्वच साधकांसाठी दिशादर्शक आहे, ह्याची ग्वाही ह्या ग्रंथाची विक्रमी विक्री देते आहे.
ह्या वर्षामध्ये अपेक्षित असलेला दुसरा मोठा ग्रंथ म्हणजे सन २००९ मध्ये पुष्कर येथे घेतलेल्या ध्यानयोगावरचा ग्रंथ. त्याचप्रमाणे सन २०११ मध्ये झालेल्या चारधाम-पंचप्रयाग यात्रेनिमित्ताने बदलापूर येथे श्री सद्गुरुंनी भीष्मस्तवराज स्तोत्रावर विवेचने केली होती. पितामह भीष्मांच्या श्रीकृष्णाप्रती असलेल्या रसपूर्ण भक्तीचा आविष्कार म्हणजे हे भीष्मस्तवराज स्तोत्र. त्यात भीष्मांनी दाखवलेली तत्त्वनिष्ठा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अंगीकारावी अशीच आहे. त्यावर आधारित एक छोटेखानी पुस्तिका, तसेच गेल्या वर्षी श्रीसत्यदत्तपूजेच्या निमित्ताने श्री सद्गुरुंनि स्वामी महाराजांच्या ‘मंत्रात्मक श्लोका’वर केलेल्या विवेचनावरील पुस्तक ह्या वर्षी प्रकाशित होणं अपेक्षित आहे.
ब्रह्मलीन श्रीस्वामी विरजानंदांनी लिहिलेल्या ‘श्रीवासुदेव यति’ ह्या इंग्रजी पुस्तकाचं विमोचन केंद्रातर्फे गेल्या वर्षी करण्यात आलं होतं. आपल्या स्थानावर विशेष इंग्रजी भाषिक साधक नसतानादेखील ह्या पुस्तकाच्याही सुमारे पाचशे प्रती संपल्या आहेत. आपल्या प्रकाशनांचा आजवरचा मेरुमणी ठरलेलं पुस्तक म्हणजे (अ)घोरकष्टोद्धरण पुस्तक. ह्या ग्रंथाचीही ५वी आवृत्ती संपली असून आजपर्यंतचा ह्या पुस्तकाचा खप आठ हजार इतका आहे व त्याची पुढील आवृत्ती पुढच्या काही दिवसांमध्ये काढण्यात येत आहे. आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्र मालिकेची पुस्तिका देखील संपली असून त्याचीही पुढील आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
गेल्या २१ वर्षांतला संपूर्ण कार्य आढावा घ्यायचा ठरवलं, तर त्यासाठी एक तासही कमी पडेल, इतका ह्या कार्याचा विस्तार झालेला आहे. २१ वर्षांपूर्वी श्रीसद्गुरुंनी सुरुवातीस केलेल्या संकल्पाप्रमाणे यज्ञचक्र सुरू झालं. कालौघात सद्गुरुतत्त्वाच्या निर्णयाप्रमाणे आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या रूपाने त्याला भक्तिचक्रही जोडलं गेलं. श्री सद्गुरुंनी त्याची प्रथमत: प्रगट सुरुवात केली, ती आद्य शंकराचार्यांवरच्या चरित्र आणि स्तोत्र मालिकेने. तद्नंतर श्री स्वामी महाराजांनी रचलेल्या स्तोत्रांचीही त्याला जोड दिली गेली. यज्ञमार्ग हा पूर्णत: कर्ममार्ग असूनही त्याला अद्वैत साधनेची पुष्टी दिली गेली, पण त्या बरोबरच विविध देव-देवतांच्या वैदिक तसेच पौराणिक स्तुती सुमनांद्वारे आणि स्तोत्रांद्वारे त्या त्या प्रतीकाला यज्ञसन्मुख आळवलं गेलं. कदाचित कोणाला प्रश्न पडू शकेल की यज्ञामधून अद्वैत प्रतिपादित करत असताना, द्वैतमूलक प्रतीकोपासना यज्ञसन्मुख कशाकरिता घेतली असावी?
वस्तुत: ह्याचं उत्तर श्री सद्गुरुंनी त्यांच्याच एका विवेचनात दिलं आहे. एखादा मनुष्य, हा त्याच्या आईसाठी मुलगा असतो, पत्नीसाठी पती असतो, मुलासाठी बाबा असतो, बहिणीसाठी भाऊ असतो, कार्यालयात सहकारी असतो, पण म्हणून काही ती त्याची वेगवेगळी व्यक्तिमत्त्व असत नाहीत. एकच मनुष्य प्रत्येक कार्यासाठी त्या त्यानुरूप भूमिका पार पाडत असतो, त्याचप्रमाणे एकच ब्रह्मशक्ती कार्यभेदाप्रमाणे आविष्कारित होत असते. मानवाने आपापल्या आवडीनुसार त्या शक्तीला रूप प्रदान केलं एवढंच. त्या त्या रूपाची प्रतीकोपासना, ही वस्तुत: त्या आविष्काराची, आराधना असते. ह्या पार्श्वभूमीवर, सुप्त आणि प्रगट अशा दोन्ही रूपात अदृश आणि दृश्य विश्वात भरून राहिलेल्या एकमेवाद्वितीय प्रकाशशक्तीद्वारे, त्या एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्त्वाची, त्याच्या विविध प्रतीकांतलं एकत्त्व समजून केलेली आराधना, ही अर्थातच अधिक संयुक्तिक आणि प्रभावी आहे.
ह्या यज्ञसाधनेचं फलित साधकांना समजावं, म्हणून श्री सद्गुरुंनी पहिल्या यज्ञापासूनच त्याला विवेचनांची जोड दिली आणि २१ वर्षांपूर्वी यज्ञचक्राबरोबरच ज्ञानचक्रही सुरू झालं, जे आजतागायत सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील. गेली अनेक वर्षे, श्री सद्गुरुंनी निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या प्रसंगी अभ्यासपूर्ण अशी हजारो विवेचने केली आहेत, जी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि ज्ञानप्रदायक आहेत. विशेष म्हणजे गेल्या २१ वर्षांमध्ये कोणतंही विवेचन किंवा त्याचा विषय, श्री सद्गुरुंनी जसाच्या तसा रिपीट केलेला नाही, प्रत्येक वेळी निवडलेल्या विषयाला नवी ज्ञानदिशा दिली आहे. अजूनपर्यंत ह्यापैकी केवळ काही भागच प्रकाशित होऊ शकलेला आहे, परंतु पुढील काही वर्षामध्ये अनेक मोठे ग्रंथ आपण प्रकाशित करू, असा संकल्प आहे. अजूनपर्यंत प्रकाशित झालेल्या वाङ्मयाला मिळालेली जनताजनार्दनाची पसंती पाहता, ब्रह्मलीन स्वामी विरजानंदांनी श्री सद्गुरु म्हणजे स्वामी महाराजांचं अवतरण असल्याबाबत जे जाहीर उद्गार आपल्याकडे यज्ञसन्मुख काढले होते, त्याचे स्मरण होते. पहिल्या पुस्तक प्रकाशनावेळी ह्या प्रचारकार्याची न जाणवलेली कार्यव्याप्ती आज ७ वर्षानंतर आणि एकंदर २५ ग्रंथांच्या प्रकाशनानंतर मात्र निश्चितपणे जाणवते आहे.
हा अफाट ज्ञानठेवा जसा आपल्याला मिळालेला आहे, तसाच तो इतरेजनांनाही मिळावा, म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आश्वासनाने हे कार्य श्री सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नव्या वेगाने उत्तुंग झेप घेईल. गेल्या २१ वर्षांमधले वार्षिक यज्ञ फिरते होते; त्या निमित्ताने श्री सद्गुरुंच्या विचारप्रणालीचा प्रसार सर्वदूर झाला. आता आपण निश्चय करुया की यज्ञसाधना केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती आपण आपले जीवन आणि आपली सेवा, आपले प्रचारकार्य आपण फिरते ठेवू.
आजच्या संकल्पपूर्तीच्या २१ वर्षांच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा संकल्प करुया की, श्री सद्गुरुंनी आपल्याकडून करवून घेतलेल्या कर्म, ज्ञान आणि भक्ती मार्गाचं मन:पूर्वक आचरण आपल्या जीवनात आपण करू आणि श्री सद्गुरुंच्या ह्या यज्ञ साधनेचा, त्यांनी आपल्याला दिलेल्या, देत असलेल्या आणि देणार असलेल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार आपण करू.
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
||नर्मदे हर हर ||
Close x
|| नमो गुरवे वासुदेवाय ||
परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण यज्ञाच्या निमित्ताने घेतलेला कार्य आढावा- १२ नोव्हेंबर २०१७
दिनांक १५ नोव्हेंबर २०१५ म्हणजे कार्तिक शुद्ध चतुर्थी ह्या दिवशी आपले सगळ्यांचे सद्गुरु, आपले मार्गदर्शक, आपल्या जीवनाचे केंद्रबिंदू असलेले परमपूज्य श्री बापट गुरुजी ह्यांनी आपला भौतिक देह पंचतत्त्वात विलीन केला आणि ते चैतन्य रूपाने आपल्या अंतरामध्ये, आपल्या हृदयात निवास करु लागले. ह्या घटनेला आज दोन वर्ष झाली.
असं म्हणतात की सत्पुरुषांनी आपल्या देहाच्या मर्यादा सोडल्या की त्यांचं चैतन्य अधिक जोमाने, अत्युच्च शक्तीने कार्यरत होतं आणि आपलं इप्सित कार्य अनेक देहांच्या आणि मनांच्या माध्यमातून पूर्ण करु लागतं. ज्ञानी लोकांनी केलेल्या ह्या विधानाची प्रचिती आज आपण प्रत्येक जण घेतो आहोत. श्री गुरुजी नेहमी सांगत की जिथे गती असते तिथे शक्ती असते आणि जिथे शक्ती असते तिथे गती असतेच! गेली दोन वर्ष, इतक्या प्रचंड गतीने गतिमान झाली की कदाचित त्यामुळे आपल्याला त्यामागच्या शक्ती स्रोताची जाणीव होऊ शकली नसावी. परमपूज्य सद्गुरुंच्या ह्या सुप्त शक्तीची जाणीव आणि त्याची खात्री माझ्यासह आपल्यापैकी प्रत्येकाला व्हावी आणि ज्याना ती खात्री निश्चितपणे झाली आहेच अशांची ती वृद्धिंगत व्हावी ह्या प्रेरणेने गत दोन वर्षात घडलेल्या कार्यांचा आढावा अगदी संक्षिप्तरूपाने आपण श्री सद्गुरुंच्या द्वितीय पुण्यस्मरण यज्ञाच्या निमित्ताने घेणार आहोत.
आपल्याला स्मरत असेल की श्री सद्गुरु ज्या महिन्यात ब्रह्मलीन झाले त्यावेळी आपला २५ कोटी नामजप संकल्प सुरु होता. त्या कठीण प्रसंगातही, आपलं व्यक्तिगत दु;ख बाजूला ठेवून पूज्य आईंनी हा नामजप संकल्प पूर्ण करायचा निश्चय केला आणि श्राद्धाच्या दिवशी सुद्धा, आपण सगळ्यांनी नामजप करून श्री सद्गुरुंना अभिप्रेत असलेलं सत्कर्म करावं आणि त्याद्वारे त्यांच्या प्रती श्रद्धा अर्पण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांच्या ह्या आज्ञेला स्मरून आपण सगळ्यांनी हा नामजप संकल्प दत्तजयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री सद्गुरुचरणी अर्पण केला. त्यानंतरचा डिसेम्बर महिन्याचा यज्ञसुद्धा कोणताही खंड न पडता यथोचित रीत्या संपन्न झाला आणि तो आजही अव्याहतपणे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आणि काही इतर विशेष दिवशी म्हणजे रामनवमी, शिवरात्र आणि पितृपक्षात सुरु आहे. आजपर्यंत म्हणजे आजचा यज्ञ धरून आपले ३७३ यज्ञ संपन्न झाले आहेत.
परमपूज्य श्री सद्गुरुंनी सामूहिक यज्ञाला काही विशिष्ट अशा समाजोपयोगी आणि आध्यात्मिक उन्नती साधून देणाऱ्या उपक्रमांची जोड दिली होती. ते सर्व उपक्रम आजही अगदी यथोचित रीतीने सुरु आहेत. ह्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वैद्यकीय समुपदेशन. वैद्यक क्षेत्रात जाणकार असणारे श्री आदित्य बापट आणि डॉ संतोष सायनेकर ह्या दोघांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागाचे स्वयंसेवक हा उपक्रम घेतात. ह्यामध्ये भक्तांना त्यांच्या वैद्यकीय समस्यांसंदर्भात विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. आजवर follow-up सह जवळजवळ ६५०-७०० भक्तांनी ह्या सेवेचा लाभ घेतला आहे. वैद्यकीय विभागामार्फत घेतला जाणारा अजून एक उपक्रम म्हणजे ठाणे येथील श्री वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने यज्ञ प्रसंगी घेतलं जाणारं रक्तदान शिबीर. आजपर्यंत एकूण चार शिबिरं संपन्न झाली असून प्रत्येक शिबिरात किमान ६५ ते ७० रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे. ह्याशिवाय बाह्य ठिकाणी जाऊन वैद्यकीय शिबीर घेण्याचा श्री आदित्य बापट ह्यांचा मानस असून त्यासंदर्भातल्या सूचना आपल्याला लवकरच प्राप्त होतील.
यज्ञ साक्षीने अगदी नियमितपणे घेतले जाणारे पुढचे दोन उपक्रम म्हणजे जन्म-पूर्व संस्कार आणि बालसंस्कार वर्ग. हे दोन्ही उपक्रम आपल्या साधकांना भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. पुढची पिद्धी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम, उत्तम संस्कारांनी संस्कारित आणि उत्तम विचारांनी समृद्ध अशी निर्माण व्हावी म्हणून इच्छुक जोडप्यांसाठी यज्ञामध्ये, दुपारच्या सत्रात जन्मपूर्व संस्कार घेतले जातात. गेल्या दोन वर्षात ५९७ साधकांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
यज्ञात येणारी लहान मुलं हे उद्याचे नागरिक, उद्याचे साधक आणि उद्याचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्यासाठी यद्न्याच्या दिवशी बालसंस्कार वर्ग घेतले जातात ज्यामध्ये ह्या मुलांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. १५ ते २० बालसाधक ह्या उपक्रमाचा नित्य लाभ घेत आहेत. त्यामध्ये सूर्यनमस्कार, ध्यान, स्तोत्र, बौद्धिक क्षमता वाढवणारे खेळ, चित्रकला- हस्तकला, यज्ञ साक्षीने सरस्वती मंत्र आणि मेधा स्तोत्राचं पठण तथा हवन घेतले जातात. सध्या विनोबांची गीताई मुलं आवडीने शिकत आहेत.
ह्या उपक्रमांशिवाय प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कल्याण–बदलापूर परिसरातल्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून विद्यार्थी साहाय्यक योजना राबवत असतो. पहिली ते दहावी पर्यंतच्या गरजू शाळकरी मुलांना शाळेची दप्तरं आणि इतर साहित्य आपण देतो आणि हा ज्ञानाचा दिवा समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचावा ह्यासाठी प्रयत्न करतो.
दरवर्षी गणेश विसर्जनानंतर कल्याण येथील गणेश घाटावर आपले स्वयंसेवक स्वच्छता अभियान आयोजित करतात. देहबाह्य परिसराची, निस्वार्थ भावनेने स्वच्छता केल्यामुळे अंतर्शुद्धी व्हायला मदत होते असं श्री सद्गरु नेहमी सांगत असत, त्यास अनुसरून हा उपक्रम आपण नित्याने घेत असतो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ह्या उपक्रमाची लेखी नोंद घेऊन आपल्याला तसे आभार पत्र दिले आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेचे प्रमुख श्री मदान साहेब ह्यांनीही अभिनंदन पत्र संस्थेला दिले आहे.
परमपूज्य श्री सद्गुरुंनी यज्ञ प्रसंगी तसेच इतरत्र जी ज्ञान सत्र घेतली, त्या विवेचनांच्या आधारे, लेख किंवा ग्रंथ निर्मिती करून ती प्रकाशित करण्याचा उपक्रम आपण २००८ पासून सातत्याने राबवत आहोत. ह्या दोन वर्षात आपल्या भेटीला श्री सद्गुरूंचे अनेक मौलिक ग्रंथ आले आहेत. ह्या मध्ये ‘ध्यानातून ध्येयाकडे’ , ‘अपराधक्षमापन स्तोत्र : संपूर्ण अर्थ आणि विवरण ’, ‘स्तोत्रसुधा’, ‘श्रीकृष्ण नावाचे सावळे सामर्थ्य’ ही नवीन पुस्तकं आपल्या भेटीला आली तर इतर काही लोकप्रिय पुस्तकांच्या नवीन आवृत्ती आपण वाचक-भक्तांना उपलब्ध करून दिल्या. ह्याशिवाय अक्कलकोट स्वामी दर्शन, विश्वपंढरी, जय सचिदानंद, धनुर्धारी, गुरुतत्त्व, अशा मासिकांमधून श्री सद्गुरुंच्या विवेचानांवर आधारित लेख प्रसिद्ध झाले. अजूनही काही पुस्तकं प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. सद्गुरु मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक मौलिक विचार सर्व इच्छुक वाचक-साधकापर्यंत पोहोचावा आणि त्या प्रत्येक ज्ञात –अज्ञात साधकाला त्यातून लाभ व्हावा हाच आपला संकल्प आहे आणि हा संकल्प पूर्ण करून घ्यायला श्री समर्थ आहेत.
२०१६-१७ ह्या वर्षामध्ये यज्ञ साक्षीने अजून दोन-तीन महत्त्वाचे उपक्रम आपण घेतले. ह्यामध्ये प्रथम म्हणजे श्री सद्गुरुंच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ११ कोटी नमो गुरवे वासुदेवाय ह्या सिद्ध नाममंत्राचा माळेवरचा जप, ११ लक्ष लिखित नामजप आणि अकरा भक्तांच्या घरी नामस्मरण असा संकल्प केला. पूज्य आईंनी हा संकल्प गेल्या वर्षीच्या डिसेम्बर महिन्यातल्या यज्ञात जाहीर केला आणि हा संकल्प आपण अकरा महिन्यात श्री सद्गुरु कृपेने पूर्ण केला. ह्याच संकल्पाला आपण नवविधा भक्ती सत्संग शिबिरांची जोड दिली. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, दादर, पनवेल, बोरीवली, वसई, पुणे अशा एकूण ९ ठिकाणी आपण सगळे एकत्र आलो, नामजप केला, स्तोत्रपठण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरुंच्या विवेचनांचं श्रवण एकत्र येऊन केलं. एकत्र या आणि सत्कर्म करा ह्या सद्गुरुंच्या शिकवणीचा अगदी यथार्थ धडा आपण सगळ्यांनी गिरवला असं म्हणायला हरकत नाही. ह्या शिबिरात नियमितपणे यज्ञाला येणार्या साधकांबरोबरच काही बाह्य साधकही सहभागी झाले. नामजपाच्या संकल्पात परभणी, औरंगाबाद, गोवा, नाशिक ह्यासह काही परदेशातले साधकही सहभागी झाले. औरंगाबादच्या श्री अरविंद देशमुख काकांनी दररोज नित्याने २२ माळा जपसंकल्प पूर्ण केला आणि आता ते नर्मदा मय्येच्या पाचव्या पायी परिक्रमेला प्रस्थान ठेवणार आहेत.
परमपूज्य श्री सद्गुरू बापट गुरुजी, परमपूज्य श्री भाऊ महाराज करंदीकर आणि प.प. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्या तीन सत्पुरुषांच्या जन्मतिथी निमित्त आपण ऑगस्ट महिन्यात तीन दिवसीय श्री यज्ञाचे आयोजन केले. ह्या तीन दिवसात १०८ सामुहिक सत्यदत्त पूजा, नामजप, लक्शार्चना, नामस्मरण, सद्गुरू विवेचनांचे श्रवण अशी सात्त्विक आनंदाची लयलूट आपण अनुभवली.
गेल्या काही वर्षापासून बोरीवली इथे पुष्टपती गणेश मंदिरामध्ये ‘मंत्र-सराव’ वर्गाचे आयोजन आपले साधक नित्याने करत आहेत. बदलापूर इथे श्री सद्गुरुंच्या निवास स्थानी ज्या पद्धतीने गीता वर्ग चालतो तसाच हा उपक्रम आहे. ह्या मध्ये सद्गुरुंनी संथा दिलेल्या विविध स्तोत्र-मंत्रांचे पठण, दासबोध आणि श्री सद्गुरुंच्या ग्रंथांचे वाचन केले जाते. अनेक भक्त ह्याचा लाभ घेतात.
श्रीसद्गुरूंची ग्रंथ संपदा सर्वदूर पोहोचावी ह्या उद्देशाने अघोरकष्टोद्धरण स्तोत्र प्रचार आणि प्रसार हा कार्यक्रम श्री सद्गुरू आज्ञेने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने जुलै २०१५ मध्ये आपण सुरु केला. ह्या मध्ये श्री सद्गुरुंच्या विविध ग्रंथ प्रचाराबरोबरच, सद्गुरू कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे, स्तोत्र प्रचार करणे, नमो गुरवे वासुदेवाय ह्या नाममंत्राचा प्रचार करणे हे उद्देश सुद्धा अंतर्भूत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातल्या विवध ठिकाणी आणि गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजराथ, तेलंगणा अशा परराज्यात मिळून एकूण 59 कार्यक्रम संपन्न झाले आहेत. जून २०१७ मध्य पूज्य आईंच्या उपस्थितीत बदलापूर येथील हनुमान मंदिरामध्ये आपला ५० वा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये आजपर्यंत सुमारे पावणेचार हजार साधकांनी सहभाग घेतला असून अडीच हजारपेक्षा जास्त ग्रंथांची विक्री झाली आहे. शिवाय अनेक साधकांनी यंत्र आणि मंत्र साधनेचा संकल्प केला आहे. अघोर, गुरुस्तुति, करुणात्रिपदी ह्या स्तोत्रांचा प्रचार ह्यात प्रामुख्याने केला गेला. ह्या शिवाय काही साधकांनी व्यक्तिगत पातळीवर श्री गुरुजींच्या नर्मदा परिक्रमा एक अभ्यासपूर्ण आनंद यात्रा ह्या ग्रंथाचे प्रचार कार्यक्रमही घेतले. नर्मदा ग्रंथ प्रचाराच्या सामुहिक कार्यक्रमाची रूपरेषा श्री आदित्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली असून त्याचेही कार्यक्रम आपण घेणार आहोत.
सद्गुरूंचे ग्रंथ amazon.in तसेच bookganga.com ह्या संकेत स्थळावर हार्ड बुक तसेच इ-बुक व ऑडीओ बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आपला आगामी काळातला मानस आहे. ह्या शिवाय आपले संकेत स्थळ नवीन स्वरूपात आणायचे आहे. ह्यातली जाण असणाऱ्या आणि कार्य करण्याची इच्छा असणार्या साधकांनी कृपया श्री आदित्य ह्यांच्याशी संपर्क करावा. तसंच ग्रामीण भागात वैद्यकीय शिबीर सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी श्री संभाजी चिपकर ह्यांच्याकडे तशी नाव नोंदणी जरूर करावी.
श्रीसद्गुरुंनी आपल्या प्रत्येकाच्या मनात जे सत्कर्माच बीज रुजवलं, त्याचा वृक्ष व्हावा असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर मग आपण एकच करायला हवं, ते म्हणजे सगळे संशय-शंका सोडून तसा निश्चय आपण यज्ञ साक्षीने करायला हवा. इतर कोणताही विकल्प मनात न आणता सद्गुरु कार्य आणि त्यांनी दिलेली यज्ञ साधना एवढच ध्येय ठेवून त्या ध्येयाला समर्पित साधक बनण्याची आज गरज आहे, नाही का? समाजाचा उद्धार आणि आत्मकल्याण साधून देणारं यज्ञ नावाचं श्रेष्ठ साधन आपल्याला अनंत काळापर्यंत लाभावं अशी जर आपली पारमार्थिक अर्थाने स्वार्थी इच्छा असेल तर पूज्य आई, श्री आदित्य आणि विविध सेवा देणारे आपले स्वयंसेवक ह्यांच्या साथीला आपण सगळे भक्त जर तन-मन-धनपूर्वक जर उभे राहिलो तर हा वटवृक्ष अनेकांना निरंतर आधार देऊ शकेल ह्यात शंका नाही. तशी प्रेरणा आणि तशी निष्ठा आपल्या सर्वांना श्री सद्गुरू प्रदान करोत आणि कार्य करताना होणार्या कमी-जास्त अपराधांना क्षमा करून त्या चुका पुन्हा घडू नयेत ह्यासाठी बळ देवोत हीच त्यांचे चरणी विनम्र प्रार्थना!
नमो गुरवे वासुदेवाय! हरी ओम!