"वासुदेव उवाच"
"जीवनात अर्थातला अनर्थ आणि अनर्थातला अर्थही समजला पाहिजे."

नाम साधन पै सोपे, नामातील अध्यात्म आणि विज्ञान


मानवाचं सर्वांगीण कल्याण ज्यात निहित आहे अशा अनेक साधना भारतीय अध्यात्मशास्त्राने सांगितल्या आहेत. त्यापैकी सुलभ अशी साधना म्हणजे 'नाम साधना'! आजवर सर्वच संत महंतांनी नामाचे माहात्म्य गायिले आहे आणि वेळोवेळी समजावूनही सांगितले आहे. ह्या नाम साधनेचे अंतरंग मर्म, त्यातील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी त्यांच्या "नाम साधन पै सोपे, नामातील अध्यात्म आणि विज्ञान" या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ग्रंथात मांडला आहे. विविध बोधपर गोष्टी, नामामुळे देह-मनावर होणारे सूक्ष्म परिणाम, नाम साधनेची पथ्ये, आणि नाम साधनेची अनिवार्यता या विषयांवर सद्गुरु प्रामुख्याने प्रकाश टाकतात. सद्गुरु म्हणतात, "अशाश्वत अशा गोष्टींसाठी दिवसातले चोवीस तास देताना काही काळ तरी आत्म्याच्या उन्नतीसाठी देता आले पाहिजेत. ईश्वराचे 'नाम' घेणे हेच आत्म्याचे अन्न आहे." 

हा ग्रंथ 71 लेखांच्या स्वरूपात आहे. नामाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांचा सद्गुरुंनी परामर्श घेतला आहे. सद्गुरुंच्या ओघवत्या शैलीतील ही ज्ञानपूर्ण विवेचने वाचताना भक्तासमोर नाम साधनेतील अध्यात्म आणि विज्ञान सहज उलगडले जाते आणि भक्त नामाच्या वाटेवर आत्मविश्वासाने अग्रेसर होत जातो