"वासुदेव उवाच"
"संसार हा खैराचा वृक्ष आहे, चढायला लागलात की इतके काटे बोचतात की तुम्हाला आईचं दूध आठवतं."
श्रीनर्मदा परिक्रमा : एक अभ्यासपूर्ण आनंद यात्रा
विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात असे प्रतिपादन करणाऱ्या परमपूज्य सद्गुषरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी दिनांक १ जानेवारी २०११ रोजी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या खोपोली येथील मूर्तीस्थानावर श्रीनर्मदा परिक्रमेचा संकल्प प्रथमतः जाहीर केला. या नंतर बदलापूर येथे ९ जानेवारी २०११ रोजी आयोजित केलेल्या श्रीगणेश यज्ञात श्रीनर्मदा परिक्रमेच्या संकल्पाचे यज्ञ सन्मुख पुनरुच्चारण त्यांनी केलं. थोरले स्वामी महाराज आणि श्रीनर्मदा मैयाच्या कृपाशीर्वादाने श्री गुरुजींच्या मुखातून हा संकल्प घडला मात्र आणि त्या दिवसापासून सर्व गोष्टी अत्यंत वेगाने घडू लागल्या. संकल्पानंतर अवघ्या दहा महिन्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०११ या कालावधीत ३२० स्त्री-पुरुष भक्तांच्या महासमूहाने श्रीसद्गुटरुंच्या सान्निध्यात ही परिक्रमा पूर्ण देखील केली! या अद्भू त सोहळ्याचे सिंहावलोकन आता आपण करणार आहोत .

परिक्रमा माहात्म्य
नर्मदे त्वं महाभागा सर्वपापहरी भव ।
त्वदप्सु या शिला: सर्वा: शिवकल्पा भवन्तु ताः ॥


 पुराणांतल्या उल्लेखाप्रमाणे भगवान शंकरांनी श्रीनर्मदेला तिच्या उत्पत्तीनंतर असं वरदान दिलं की ," हे भाग्यशालिनी नर्मदे, तू सर्व पापांचे हरण करणारी होशील, तुझ्या पाण्यात स्थित असलेले सर्व पाषाण शिवतूल्य होतील". या वरदानानुसार, सर्वात प्राचीन आणि पुण्यदायिनी अशा नर्मदा मातेच्या परिक्रमेला संपूर्ण भारत वर्षात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परिक्रमा करणं म्हणजे नर्मदामातेला कायम उजवीकडे ठेवून, उगमापासून मुखापर्यंत संपूर्ण प्रदेशात प्रवाहाचं उल्लंघन न करता प्रदक्षिणा पूर्ण करणं. नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याचं खडतर तप प्राचीन काळापासून अत्यंत भक्तीभावाने केलं गेलं आहे. मोक्षदायिनी नर्मदा मैयाच्या किनारी निवास करून गृत्समद ऋषी, भृगु ॠषी, महर्षी कपिलाचार्य, सती अनसूया आणि अत्री महर्षी, भगवान परशुराम या सारख्या अनेक ऋषी-मुनींनी साधना केली आहे. श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य यांनी त्यांचे सद्गुऋरु असलेल्या गोविंदपादांची सेवा रेवातीरावर केली आणि इथेच त्यांच्या कडून नर्मदालहरी, नर्मदाष्टकम या प्रसिद्ध स्तोत्रांची रचना झाली असं इतिहास सांगतो. अर्वाचीन काळातही अनेक साधु-संत-संन्यासी सत्पुरुष मैयेच्या किनारी तपानुष्ठान करताना आढळतात. अशा पवित्र तीर्थस्थळाची परिक्रमा तीही प्रत्यक्ष सद्गुारुंच्या सान्निध्यात करणं म्हणजे एक अमृतसिद्धी योगच आहे अशी भावना सर्व भक्तांच्या मनात दृढ झाली आणि सद्गु्रुंच्या मार्गदर्शनाखाली परिक्रमेची तयारी करण्यास सुरुवात झाली.

परिक्रमा पूर्वनियोजन
 "एकत्र या आणि एकत्र साधना करा" या सद्गुररु बापट गुरुजींच्या तत्त्वानुसार जात-पात-धर्म-लिंग-वय यापैकी कोणतंही बंधन न घालता श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येक इच्छुक साधकाला बरोबर घेऊन श्रीनर्मदा मैयाची सामूहिक परिक्रमा करण्याचा श्री गुरुजींचा मानस होता. ज्ञान, भक्ती आणि कर्म मार्गांचा यथोचित मेळ घालून प्रत्येक सहभागी साधकाला तप, सत्संग आणि सेवा करण्याची संधी निर्माण करणं हा परिक्रमेचा मूळ उद्धेश होता. या उद्देशानुसार नर्मदा किनारीच्या वेगवेगळ्या तपोभूमींवर सामूहिक यज्ञ, नामजप, नामस्मरण, नर्मदा पूजन, दीपदान, कन्यापूजन, पितृकार्य आदि विविध कार्यक्रम मैयातीरी संपन्न झाले पाहिजेत अशी श्रीगुरुजींची आज्ञा होती. यानुसार परिक्रमेमध्ये पुढील आध्यात्मिक संकल्पनांचा अंतर्भाव करून परिक्रमेच्या संकल्पाला एक वैशिष्ट्यपूर्ण आकार श्रीगुरुजींनी दिला.

 संपूर्ण परिक्रमेत श्री थोरल्या स्वामी महाराजांची छत्र-चामर-मशाल-दंड-सूर्य-चंद्रासह पालखी आणि रथ मिरवण्याचा संकल्प
• 'नमो गुरवे वासुदेवाय' या नाममंत्राचा मोठ्या संख्येने नामजप पूर्ण करण्याचा संकल्प
• अनेक सत्पुरुषांच्या तपोनुष्ठानाने पवित्र झालेल्या स्थळांवर एकूण बारा यज्ञ घेण्याचा संकल्प
• विविध स्थळांवर दीपदान, अर्घ्यदान, नर्मदा पूजन, कन्यापूजन भक्तांकडून करवून घेण्याचा संकल्प
• परिक्रमेदरम्यान सत्पुरुष आणि समाज धुरिणांचा यथोचित गौरव करण्याचा संकल्प

 नर्मदा किनारीचा खडतर, डोंगराळ प्रदेश, शहरी सोयी-सुविधांची सवय असणारा श्रीगुरुजींचा भक्तगण आणि घडलेल्या संकल्पाचे विशाल स्वरूप, या सगळ्याचे समीकरण मांडणं खरोखर एक आव्हान होतं. परंतु श्री गुरुजींसारखा प्रचंड व्यवस्थापकीय कौशल्य आणि व्यवहारचातुर्याने परिपूर्ण असणारा संतपुरुष पाठीशी असल्यामुळे परिक्रमेचे अत्यंत काटेकोर आणि अचूक असं नियोजन केलं गेलं. या साठी स्वयंसेवकांच्या एकूण सहा चमुंनी श्रीनर्मदा परिक्रमा मार्गावरील वेगवेगळ्या सहा प्रदेशांचं सखोल सर्वेक्षण केलं. नियोजनाच्या या टप्प्यात पायी परिक्रमा पूर्ण केलेले श्री सुहास लिमये, श्री नर्मदा प्रसाद(दिनकर)जोशी, श्री व सौ प्रतिभा चितळे, श्रीमती उष:प्रभा पागे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.
संबंधित प्रदेशात परिक्रमेचा सोयीचा मार्ग कोणता, कोणत्या टप्प्यात पायी चालणं शक्य आहे, कोणत्या ठिकाणी बस प्रवास करणं अनिवार्य आहे, भोजन-मुक्कामासाठी सोयीची ठिकाणं कोणती, परिसरात उपलब्ध असलेल्या इतर सुविधा (किंबहुना सुविधांचा अभाव) इत्यादी बारीक-सारीक माहिती, नकाशे एकत्र केले गेले. परिक्रमा मार्गावरच्या विविध आश्रमांना भेट देऊन, तिथल्या व्यवस्थापकांना परिक्रमेची पूर्वकल्पना देऊन, त्यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. नियोजित वेळेत नियोजित सर्व कार्यक्रम संपन्न होतील या बेताने परिक्रमेचा कच्चा आराखडा तयार केला गेला. या आराखड्यानुसार दररोज काही अंतर पदभ्रमण तर काही अंतर वाहन प्रवास करून परिक्रमा पूर्ण करण्याचं नियोजन केलं गेलं होतं. स्वयंसेवक साधकांनी तयार केलेल्या या कच्च्या आराखड्यातल्या उणीवा दूर करून त्याला अंतीम स्वरूप देण्यासाठी, नर्मदा किनारी वास्तव्य करून श्री थोरले स्वामी महाराज आणि श्रीदत्तप्रभुंची अनन्यभावे भक्ती करणाऱ्या दोन सत्पुरुषांचं अमूल्य असं मार्गदर्शन स्वयंसेवकांना मिळालं. हे दोन सत्पुरुष म्हणजे भालोदचे पूज्य श्री प्रतापे महाराज आणि तिलकवाडा येथील पूज्य श्री विष्णुगिरी महाराज. " ही पालखी-परिक्रमा म्हणजे श्री महाराजांचं १०० वर्षांनी नर्मदा किनारी होणारं पुनश्च अवतरण आहे’ या भावाने या दोन्ही संतपुरुषांनी परिक्रमेच्या पूर्वनियोजनात तर सहभाग दिलाच शिवाय प्रत्यक्ष परिक्रमेतही भक्तांना सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. ही परिक्रमा प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र, बदलापूर/कल्याण या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली.

पाउले चालती नर्मदेची वाट
सद्गुारुंसमोर देहाने आणि मनाने संपूर्ण शरणागती स्वीकारून, दि. ३ नोव्हेंबर रोजी एकूण ३२० अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष भक्त परमपूज्य सद्गुोरु श्री बापट गुरुजी आणि गुरुपत्नी परमपूज्य सौ. अनघाताई बापट यांच्या कृपाछत्राखाली परिक्रमेस मार्गस्थ झाले. त्याआधी ९ ऑक्टोबर २०११ रोजी बदलापूर येथे झालेल्या शक्ती स्वाहाकाराच्या प्रसंगी श्री गुरुजींनी परिक्रमेस प्रत्यक्ष येणाऱ्या आणि प्रारब्धाच्या अडचणींमुळे केवळ मनाने उपस्थित राहणाऱ्या सर्व भक्तांकडून पुढील संकल्प उच्चस्वरात, यज्ञ सन्मुख करून घेतला.

’हे परमपूज्य सद्गुुरु, आपण आमच्या हृदयांतरी नित्य वास करता, नव्हे तेथे आपलेच अधिष्ठान आहे. आई आपल्या लहानग्याला हळुहळू चालायला शिकवते, तेव्हा त्याचे एक बोट तिच्या हातात असते. तिच्याच आधाराने त्याने टाकलेल्या दोन पावलातही तिला जे कौतुक असते, ते म्हणजे तिचे आपल्या लहानग्यावरील निर्हेतुक प्रेम असते. तद्वतच, नर्मदा परिक्रमेचे हे शिवधनुष्य आपण आमच्या हाती दिले आहे. त्याची पूर्तीदेखील आपणच करणार आहात, आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत याचे आम्हाला ज्ञान आहे. आपल्या आमच्यावरील नित्य कृपेला स्मरून आम्ही आपल्याला वंदन करतो आणि विनवतो, की हे शिवधनुष्य पेलण्याइतकी शक्ती, युक्ती आणि भक्ती आम्हाला द्या. आपल्या आधारानेच अध्यात्मयात्रेचा आरंभ केलेली आम्ही आपली बालके जाणतो, की आपल्याशिवाय नर्मदा परिक्रमाच काय, पण आमची जीवनपरिक्रमादेखील अपूर्ण आहे. आज आम्ही आपल्याला आत्मीयतेने आवाहन करतो, की आपण आखून दिलेल्या चाळीस दिवसांच्या या आनंदयात्रेत आपल्या पालखीच्या निमित्ताने आपले अखंड साहचर्य आम्हाला लाभू दे. नर्मदा मैया आणि आपण एकरूपच आहात, आपल्या आशीर्वादातच तिचाही आशीर्वाद अंतर्भूत आहे, कारण मैया आपल्या शब्दाबाहेर नाही हे आम्हाला माहीत आहे. आपल्या साहचर्यातच तिचेही साहचर्य आम्हाला लाभू दे, आमची आनंदयात्रा फलदायी होऊ दे.’

दिनांक ५,६,७ नोव्हेंबर २०११ या दिवशी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथील अभय घाटावर यज्ञ आणि विधीवत परिक्रमा संकल्प झाल्यानंतर दिनांक ८ नोव्हेंबर २०११ रोजी पालखी-परिक्रमा दक्षिण तटावरून रेवासागराच्या दिशेने मार्गस्थ झाली. बडवानी, राजघाट, प्रकाशा, गोरागाव, भालोद या मार्गे निघालेले परिक्रमावासी दिनांक १४ नोव्हेंबर २०११ रोजी समुद्र प्रवासासाठी सज्ज झाले. कठपोर ते मिठीतलाई अशी पाच तासाची जहाज यात्रा आणि समुद्र पूजनानंतर परिक्रमावासीयांनी उत्तर तटावरील पालखी परिक्रमा सुरु केली. नारेश्वर जवळचा पुनीत आश्रम, तिलकवाडा, कोटेश्वर, माहेश्वर, बडवाह, नेमावर, बरेली, ब्रह्मांडघाट, जबलपूर या मार्गाने प्रवास करत दिनांक ३० नोव्हेंबर रोजी अमरकंटक येथे पालखी-परिक्रमेचं आगमन झालं. घनदाट वनराईने नटलेल्या निसर्गरम्य स्थानावर मैयाचा उगम आहे. या क्षेत्राला माईका बगिचा म्हटले जाते. या स्थळावर श्री सद्गुमरु आणि सौ. आईंच्या हस्ते मैयापूजन आणि हवन संपन्न झाल्यानंतर परिक्रमावासी दक्षिण तटावरुन परिभ्रमण करू लागले. महाराजपूर, ब्रह्मांडघाट(दक्षिण तट), होशंगाबाद असा प्रवास करून दिनांक ६ डिसेंबर रोजी पालखी परिक्रमेचे पुनरागमन श्रीक्षेत्र ओंकारेश्वर इथे झालं. दिनांक ७ डिसेंबर २०११ रोजी पूज्य श्री गुरुजी आणि सौ. आईंच्या हस्ते परिक्रमा समापन विधी आणि श्रीनर्मदा मातेची सोळा उपचारांनी पूजा संपन्न झाल्यानंतर ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी परिक्रमावासीयांनी मातेचा किनारा सोडला आणि खोपोली कडे प्रयाण केलं. खोपोली स्थानावर ९ डिसेंबर रोजी उद्यापन सोहळा आणि १० डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती उत्सव संपन झाल्यानंतर पालखी-परिक्रमा ११ डिसेंबर रोजी गुरुगृही म्हणजे बदलापूर येथे पोहोचली. या दिवशी झालेल्या श्रीनर्मदालहरी स्वाहाकारानंतर निघाल्यापासून चाळीसाव्या दिवशी परिक्रमेची सांगता आशीर्वाद मंत्रांच्या प्रोक्षणानंतर झालेल्या सद्गुशरु दर्शनाच्या सोहळ्याने करण्यात आली.

परिक्रमेतला आध्यात्मिक मकरंद
परमपूज्य सद्गुारु श्री बापट गुरुजींच्या परिक्रमा संकल्पनेतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे परिक्रमेतल्या विविध साधना-कार्यक्रमांमुळे घडलेली आध्यात्मिक आनंदाची लयलूट. हे कार्यक्रम कसे आयोजित करण्यात आले आणि त्यांच्यातून कोणती अनुभूती सर्व भक्तांना मिळाली ते आपण आता क्रमशः बघणार आहोत;

यज्ञ :
प्राचीन भारताने पुरस्कृत केलेली ’यज्ञ’ ही अध्यात्मातली एक श्रेष्ठ साधना आहे. त्याची विज्ञानाधिष्ठित पुनर्स्थापना करून समाजात यज्ञ साधनेचं पुनरुज्जीवन करण्याचे स्पृहणीय कार्य , श्री गुरुजी गेले सतराहून अधिक वर्ष अविरतपणे करत आहेत. श्रीगुरुजींच्या यज्ञ संकल्पनेनुसार इच्छुक असणाऱ्या सर्व भाविकांना यज्ञात मंत्रपठणासह हवन करण्याची अनुमती दिली जाते, मात्र यासाठी कोणालाही बाध्य केलं जात नाही. (अधिक माहितीसाठी श्रीगुरुजींचा ’यज्ञरहस्य" हा ग्रंथ वाचावा) प. प. श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांसह अनेक सत्पुरुषांनी पुनीत केलेल्या नर्मदा किनारीच्या तीर्थक्षेत्रावर यज्ञांचे आयोजन केल्यास त्याद्वारे प्रचंड शक्तीची निर्मिती होईल. ही शक्ती परिक्रमावासी साधकांनाच नव्हे तर त्या क्षेत्राला, तिथल्या मनुष्यासहित सर्व जीवांना उत्तम गती देईल, त्यांना प्रगती साधण्यासाठी योग्य दिग्दर्शन करेल. या श्रेष्ठ विचारांनी प्रेरित होऊन श्रीगुरुजींनी एकूण बारा यज्ञांचे आयोजन परिक्रमेदरम्यान करण्याचा संकल्प केला. यज्ञांच्या आयोजना पाठीमागे अजून एक विचारधारा होती. ’दरमहिन्याला एक यज्ञ’ या संकल्पाबरोबरच, दरवर्षी एका तीर्थक्षेत्रावर जाऊन सात दिवसांचा यज्ञ घेण्याचा संकल्पही श्रीगुरुजींनी सन २००५ मध्ये केला होता. यानुसार चित्रकूट, हरिद्वार, खोपोली, नैमिषारण्य, पुष्कर आणि पुन्हा नैमिषारण्य असे सहा वार्षिक यज्ञ सन २०१० मध्ये संपन्न झाले. श्री नर्मदा परिक्रमेनिमित्त होणाऱ्या या बारा यज्ञांच्या मालिकेद्वारे वार्षिक यज्ञ संकल्पाची अंतीम आणि सातवी शृंखला पूर्ण करायची असा श्रीगुरुजींचा मानस होता.
अपरिचित स्थानी जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक यज्ञ घेणं ही खरोखर एक आव्हानात्मक गोष्ट होती. यज्ञासाठी सुयोग्य स्थळ निवडणे, यज्ञवेदीचे बांधकाम करणे, मंडप-बैठक व्यवस्था-हवन व्यवस्था-मंत्रविभाग इत्यादिची व्यवस्था करणे, या आणि अशा अनेक तपशीलातल्या नियोजनासाठी काही माहितगार स्वयंसेवक बंधुंचे आगावू पथक (advance team) प्रत्येक यज्ञापूर्वी काही काळ, यज्ञ स्थळावर पोहोचून सर्व व्यवस्था अचूकपणे लावत असे. श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कुशल नियोजनामुळे नर्मदा परिक्रमेत नियोजित सर्व यज्ञ सुसंपन्न होऊ शकले.
यज्ञ मालिकेचा श्रीगणेशा दिनांक ५ नोव्हेंबर २०११ रोजी अभयघाट, ओंकारेश्वर येथे झालेल्या श्रीगणेश यज्ञाने झाला. या दिवशी यज्ञ प्रज्वलनाच्या वेळी श्रीगुरुजींनी प्रभु रामचंद्राना यज्ञात उपस्थित राहून संपूर्ण यज्ञ मालिकेचे रक्षण करण्याची विनंती केली. त्यानंतर त्याच स्थळी दिनांक ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी श्रीदुर्गासप्तशती आणि रुद्रस्वाहाकार संपन्न झाले. या यज्ञांबरोबर श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे पितृ यज्ञही घेतला गेला. दिनांक १० नोव्हेंबर २०११ रोजी प्रकाशा येथील तापी नदीच्या तीरावरील पुष्पदंतेश्वर मंदिरात महिम्न स्वाहाकार संपन्न झाला. याच स्थळी पुष्पदंतेश्वर नामक गंधर्वाने शिवाराधना करण्यासाठी महिम्नाची रचना केली असा उल्लेख आढळतो. दिनांक १३ नोव्हेंबर २०११ रोजी भालोद येथे पूज्य श्री प्रतापे महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीदत्तात्रेय मंदिरात दत्तयाग संपन्न झाला. याप्रसंगी श्री महाराजांनी आपल्या शिष्यासह यज्ञाचे यजमान पद भूषवले. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र नारेश्वर जवळच्या पुनीत आश्रमात श्रीयज्ञ संपन्न झाला.
गुजराथ मधले तिलकवाडा हे क्षेत्र, गरुडेश्वर या श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या समाधी स्थळासमीप आहे. या ठिकाणी श्री महाराजांनी वास्तव्य केलं आहे. इथल्या ’वासुदेव कुटीत’ सध्या श्री विष्णुगिरी महाराजांचे कार्य चालते. या पुण्य क्षेत्री अनेक संत महात्म्यांच्या उपस्थितीत दिनांक १८ नोव्हेंबर २०११ रोजी श्री दुर्गासप्तशती स्वाहाकार पार पडला. रामपूर पासून तिलकवाड्यापर्यंत श्रीनर्मदा माई उत्तरगामिनी आहे या कारणास्तव इथे पितृयज्ञही स्वाहाकार आणि स्वधाकारासह विशेषत्त्वाने संपन्न झाला. दिनांक २२ नोव्हेंबर या दिवशी माहेश्वर इथे पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधलेल्या सुबक आणि विस्तीर्ण घाटावर श्री नर्मदा लहरी स्वाहाकाराचे आयोजन केलं गेलं. या प्रसंगी श्रीमद्‍ आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या नर्मदा लहरींचे सामूहिक पठण आणि हवन झालं. याही दिवशी अधिकीचा पितृयज्ञ घेतला गेला होता ज्यामध्ये पितृसूक्तातील मंत्रांचे उच्चारण करून, श्रीगुरुजींनी सर्व भक्तांकडून यज्ञात हवन करून घेतलं. सर्व पितृजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा महत्त्वाचा विधी नर्मदेसारख्या पुण्यक्षेत्री घडत होता हे परिक्रमावसीयांचं मोठंच भाग्य म्हणावं लागेल!
परमपूज्य सद्गुचरु श्री श्रीराम महाराज यांचं स्थान म्हणजे उत्तरतटावरील नावघाटखेडी, बडवाह, जिल्हा खरगोन इथली ’समर्थ कुटी’. या पवित्र स्थानी श्रीरामरक्षा यज्ञ संपन्न झाला. स्वतः सद्गुनरु श्री श्रीराम महाराज आणि गुरुपत्नी सौ. जानकी ताई यांनी यज्ञाचं यजमानपद भूषवलं. दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी नेमावर येथील श्रीब्रह्मचारीजी महाराज यांच्या चिन्मयधाम या आश्रमात श्रीनर्मदालहरी स्वाहाकार संपन्न झाला.आश्रमातले मुख्य संन्यासी आणि महान तपस्वी श्रीसंत गाडगीळ महाराज यांनी यज्ञाचे प्रज्वलन केलं. यज्ञाच्या मध्यान्हपूर्व सत्रात नर्मदा सहस्त्रनामाचे सामूहिक पठण तथा हवन करण्यात आलं तसंच मध्यानोत्तर सत्रात प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीनर्मदा लहरी या २९ श्लोकांच्या अत्यंत गेय अशा लहरी काव्याचं सामूहिक पठण तथा हवन झालं.
दिनांक १ डिसेंबर रोजी अमरकंटक येथील मृत्युंजय आश्रमाच्या परिसरात श्रीगायत्री यज्ञ संपन्न झाला तर दिनांक ५ डिसेंबर २०११ रोजी हौशंगाबाद जवळील श्रीसीताराम वाडी, खर्रा घाट इथल्या एकमुखी दत्तमंदिरात श्री विष्णुयज्ञाचं आयोजन झालं. हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे कारण याच स्थळी श्री थोरले स्वामी महाराज आणि श्रीनर्मदा मैयाची कन्यारूपात भेट झाली. या भेटीनंतर महाराजांचं जवळ जवळ संपूर्ण कार्य रेवातटी घडलं. महाराजांचे लहान बंधु श्री सीताराम (टेंबे) महाराजांनी काही मराठी मंडळींच्या साहाय्याने या ठिकाणी श्रीदत्तमंदिराची स्थापना केली. महाराजांच्या भगिनी मातुश्री रुक्मिणी जडये आणि त्यांचे यजमान पूज्य अनंतराव जडये यांचीही तपाराधना या ठिकाणी घडली आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी परिक्रमावासियांचे पुनरागमन श्रीक्षेत्र ओंकारेश्वर इथे झाल्यावर या स्थळीच्या अभयघाटावर हरिहर यज्ञाचे आयोजन करण्यात आलं. यज्ञ प्रज्वलनानंतर प्रथमतः श्री विष्णु सूक्ताचे पठण होऊन त्यानंतर दिवसभर रुद्राची आवर्तनं घेण्यात आली.
श्रीनर्मदा परिक्रमेदरम्यान आयोजित केलेल्या १२ यज्ञमालेचा मेरुमणी अर्थात बारावा यज्ञ बदलापूर इथे दिनांक ११ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या दिवशी श्रीनर्मदा सहस्त्रनामाचं आवर्तन झालं. या दिवशीचे विशेष महत्त्व असं की संपूर्ण यज्ञमालिकेची पूर्णाहुती या दिवशी संपन्न झाली. प्रत्यक्ष श्री गुरुजींनी आशीर्वाद मंत्रांच्या उच्चारणासह उपस्थित असलेल्या सातशे भक्तांवर आशीर्वाद मंत्रांच्या उच्चारणासह अभिषेक जलाचं प्रोक्षण केलं आणि त्यानंतर यज्ञ कार्यक्रमांची सांगता झाली.

श्रीसद्गुरुंची विवेचने :
श्रीनर्मदा परिक्रमेचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी, त्यातले ज्ञान-विज्ञान सांगण्यासाठी श्रीगुरुजींनी एकूण १४ विवेचनांचं ज्ञानसत्र परिक्रमेदरम्यान घेतलं. श्रीगुरुजींनी आपल्या रसाळ, ओघवत्या शैलीत घेतलेली ही विवेचनं म्हणजे प्रत्येक परिक्रमावासीयासाठी एक अलभ्य पर्वणीच होती. वस्तुतः भक्तांची मानसिक बैठक पक्की व्हावी म्हणून परिक्रमेपूर्वीपासूनच श्रीगुरुजी अनेक विवेचनांमधून परिक्रमेमागचं अध्यात्म ,विज्ञान आणि इतिहास समजावून देत होते, त्याची वारंवार उजळणी करत होते. परंतु परिक्रमेत घेतलेल्या विवेचनांना एक अनोखी रंगत प्राप्त झाली याचे कारण म्हणजे ही विवेचनं मैयाच्या साक्षीने आणि तिच्या उपस्थितीत झाली! नर्मदा परिक्रमेदरम्यान श्रीगुरुजींनी घेतलेल्या सखोल विवेचनांचा सारभूत वृत्तांत असा,
श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथील तीन दिवसीय यज्ञामध्ये प्रथम तीन विवेचने झाली. पहिल्या विवेचनात श्रीगुरुजींनी श्रीनर्मदेच्या आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक स्वरूपावर भाष्य करून त्यानंतर श्रीक्षेत्र ओंकारेश्वराचं स्थान माहात्म्य सांगितलं. दुसऱ्या विवेचना दिवशी संत नामदेव जयंती असल्याकारणाने त्यांच्या जीवनचरित्राविषयी सांगून श्री सद्गुचरुंनी तीर्थ विज्ञान हा विषय विवेचनात घेतला. यामध्ये तीर्थयात्रा कशासाठी करावी, तीर्थयात्रेचे प्रकार कोणते, आध्यात्मिक दृष्टीने जलतत्त्वाशेजारी तप करण्याचे महत्त्व काय आहे, अभिषेकामागचं विज्ञान याची साद्यंत माहिती दिली. ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या विवेचनामध्ये श्रीनर्मदेकडून तपाची प्रेरणा घेण्यासाठी कोणत्या पूर्व अटी आहेत, जलतत्त्वाकडून तेज ग्रहण करण्यासाठी साधकाच्या भावाला सर्वोच्च महत्त्व का आहे या विषयी विस्ताराने भाष्य केलं. परिक्रमा म्हणजे निर्हेतुकपणे नदी भोवती मारलेली फेरी नसून त्यापाठीमागे स्पष्ट असं विज्ञान आहे, या विज्ञानाचा रहस्यभेद श्रीगुरुजींनी केला.
प्रकाशा येथील महिम्न स्वाहाकाराच्या निमित्ताने, ’शिवमहिम्न स्तोत्र’ या विषयी श्रीगुरुजी सविस्तर बोलले. यामध्ये महिम्न रचनेचा इतिहास, महिम्नाचे साहित्य आणि आध्यात्मिक दृष्ट्या गुणाकलन, महिम्न पठणाची फलश्रुती हे विषय आंतर्भूत होते. यानंतर पुनीत आश्रमात झालेल्या श्रीयज्ञात, ’भवसागर’ हा विवेचनाचा विषय होता. नुकतीच रेवासागराची यात्रा करून परतलेल्या परिक्रमावासीयांना भवसागर काय हे कळावं याचं औचित्य श्रीगुरुजींनी साधलं. भवसागर म्हणजे काय, भवसागराची उत्पत्ती कशामुळे होते, भवसागर तरणोपायाचे मार्ग कोणते याची श्रीगुरुजींनी सखोल मीमांसा केली. ’सागरात समर्पित होणाऱ्या नर्मदेची ’समर्पण’ ही सर्वात मोठी शिकवण आहे. परिक्रमेच्या निमित्ताने समर्पणाचा हा जल्लोष आपल्याला समजून घेता आला पाहिजे’, श्रीगुरुजींच्या या समारोपाने सर्व श्रोतृवर्ग भावविभोर न होता तरच नवल झाले असते!

माहेश्वर येथे झालेल्या नर्मदालहरी स्वाहाकाराच्या प्रसंगी श्रीगुरुजींनी ’नर्मदालहरी’ या विषयावर विवेचन घेतलं. यामध्ये प्रथमतः महिष्मती नगरीचं स्थान माहात्म्य सांगून त्यानंतर मूळ विषयाला सुरुवात झाली. श्रीमद्‍ आद्य शंकराचार्यांना ’क्रांतदर्शी कवी’ का म्हटलं जातं, त्यांनी रचलेल्या नर्मदा लहरीतली सौंदर्यस्थळं, लहरीपठणामागचे विज्ञान आणि अध्यात्म, पठणामुळे वातावरणात होणारे परिणाम इत्यादि विषयी सखोल ज्ञान दिलं. बडवाह इथे श्रीरामरक्षा यज्ञाच्या निमित्ताने श्रीगुरुजींनी ’पूजन’ या विषयावर विवेचन घेतलं. बडवाह तसेच नर्मदा परिक्रमेतील इतर काही स्थानांचं स्थानमाहात्म्य प्रथम विशद केलं. यानंतर पूजन म्हणजे काय, पूजन कशासाठी आणि ते कसं करावं याविषयी सांगून महर्षी जाबालांनी प्राचीन काळी केलेल्या सृष्टीपूजनाविषयी रसाळ कथनही केलं. देहातले सगळे परमाणू एका गतीत आणून इष्टदेवतेची केलेली एकाग्र पूजा हे पूजनाचं सार आहे या विधानाने विवेचनाचा समारोप झाला.
हरेकृष्ण मंदीर, भेडाघाट येथे नर्मदा माईच्या निसर्गरम्य शीतल किनाऱ्यावर श्रीगुरुजींनी स्वामी महाराजांच्या नर्मदा लहरींवर भाष्य केलं आणि त्यातल्या काही श्लोकांचं अर्थासह विवरण केलं. अमरकंटक इथल्या श्रीगायत्री यज्ञात श्रीसद्गुारुंनी सुरुवातीला अमरकंटकचं स्थान-काल माहात्म्य सांगितले. त्यानंतर अनुसंधान भक्तीचा आदर्श असणाऱ्या गृत्समद ऋषींचे नर्मदाकिनारी झालेले वास्तव्य आणि जीवन कार्य, अध्यात्म आणि सामाजिक जीवन याची त्यांनी घातलेली सांगड हे सांगून अनुसंधानाच्या पायऱ्यांचे विवरण केलं. श्रेष्ठ सत्पुरुषांविषयी ओळख करून देण्याची ही शृंखला हौशंगाबाद इथे झालेल्या विवेचनातही कायम राहिली. या दिवशी योगीराज अरविंद घोष यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनकार्याची आणि तत्त्वज्ञानाची ओळख श्रीगुरुजींनी सर्व उपस्थितांना करून दिली.
मराठी भाषेत झालेल्या या विवेचनांव्यतिरिक्त श्रीगुरुजींनी आमलथा गावातल्या राममंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांसाठी हिन्दी भाषेतून ’रामनाम’ या विषयावर विवेचन घेतलं. या विवेचनानंतर श्रीमद्‍ आद्य शंकराचार्य विरचित श्रीरामचंद्र स्तोत्राचं अर्थासह विवरण करून त्याचं उपस्थित ग्रामस्थ आणि परिक्रमावासीयांकडून पठणही करून घेतलं.
परिक्रमेदरम्यान दिनांक १० डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंतीचा सोहळा खोपोली स्थानावर साजरा झाला. या प्रसंगी प.प.श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीदत्तात्रेय स्तोत्रावर श्रीगुरुजींनी केलेली विवेचनं पुस्तक रुपात प्रसिद्ध झाली. या प्रसंगी श्रीगुरुजींनी सर्व भक्तांना विवेचनाद्वारे सद्गुनरुतत्त्वाची ओळख करून दिली. सद्गुररु तत्त्वाच्या पूजेमुळे, आराधनेमुळे भक्तांना मिळणारी उत्तमगती, सद्गुदरुकृपेचं स्वरूप, शरणागत शिष्याला सद्गुेरुतत्त्व कशाप्रकारे दिग्दर्शन करतं याविषयीचं विवरण श्रीगुरुजींनी केलं.
परिक्रमेतल्या विवेचन मालिकेची समाप्ती बदलापूर येथे झालेल्या यज्ञविवेचनाने झाली. संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पूर्ती आणि फलश्रूती विदीत करणारं हे विवेचन होतं. तप म्हणजे काय, तपाचे प्रकार कोणते, तप करताना कोणत्या अडचणी उद्भवतात. सृष्टी, समाज आणि देहाचं ऋण फेडण्यासाठी यज्ञ, श्रेष्ठजनांचा सन्मान आणि तप हे मार्ग का सांगितले गेले या विषयी सांगून पूर्णाहुती म्हणजे काय या विषयाकडे श्रीगुरुजी वळले. पूर्णाहुती मागचं विज्ञान सांगताना श्रीगुरुजी म्हणाले की जसा एका शक्तीचा अंत ही दुसऱ्या शक्तीची सुरुवात असते तद्वतच परिक्रमेचा अंत म्हणजे शक्तीनिर्मितीच्या दुसऱ्या वर्तुळाचा प्रारंभच आहे. अधिक मोठ्या तपवर्तुळामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व भक्तांनी सिद्ध व्हायचं आहे! या स्फूर्तीदायक संदेशाने विवेचन मालिकेची सांगता झाली.
नर्मदा परिक्रमेतल्या या विवेचनांची लज्जत अधिक वाढली ती श्रीगुरुजींनी केलेल्या वेगवेगळ्या दृक-श्राव्य माध्यमांच्या कौशल्यपूर्ण वापरामुळे. संगणकीय स्लाईड्स, विडियो क्लिप्स, छायाचित्रं, तक्ते, फलक आणि काही वेळा तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा वापरही त्यांनी केला! याशिवाय मध्येच पेरलेले खुसखुशीत विनोद, बोधात्मक कथा, यासगळ्यामुळे श्रीगुरुजींची सर्वच विवेचनं श्रवणीय, दर्शनीय आणि संस्मरणीय अशी झाली हे निश्चित!

नामस्मरण, नामजप आणि नामघोष
सन २०१४ साली असणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी पर्यंत ’नमो गुरवे वासुदेवाय’, या नाममंत्राचा शंभर कोटींचा जपसंकल्प पूर्ण करण्याचा संकल्प आहे. या पैकी पंचवीस कोटींचा जप परिक्रमेत पूर्ण करावा असं नियोजन होतं. त्यानुसार बस-रेल्वे प्रवासात, इतर निवांत वेळी साधकांनी एकमेकांशी व्यर्थ बोलण्याऐवजी नामजप करावा अशा सूचना सर्व भक्तांना देण्यात आल्या होत्या. या वैयक्तिक जपाबरोबर, दररोज किमान एकदा टाळ, मृदुंगाच्या तालावरची सामूहिक नामस्मरणं आणि पालखी-पदभ्रमणाच्या वेळी सामूहिक नामघोष होत असे. सिद्धमंत्रांबरोबरच श्रीदत्तप्रभुंची, गुरुपरंपरेची इतर नामस्मरणं देखील घेतली जात. ज्या ज्या आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या मंदिरांना परिक्रमावासी भेट देत त्या प्रत्येक ठिकाणी त्या विशिष्ट इष्ट देवेतेचं नामस्मरण घेतलं जाई. या सर्वांवर माधुर्याची पेरणी करणारं नाम होतं ते श्रीनर्मदा मैयाचं,

"जय नर्मदे, जय नर्मदे, नमामि देवी नर्मदे
नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर, हरऽ हर"

पालखी-पदयात्रेमध्ये, दीपदानाच्या वेळी मैयातीरावर किंवा अन्य कुठेही हे नामस्मरण ताला-सुरात सुरु झालं की भक्तांची पावलं सहजच तो ताल पकडत. मैयाचा शांत अथांग किनारा, चांदण्यांचा शुभ्र प्रकाश आणि जोडीला भक्ती रसात न्हाऊन निघालेले, नामस्मरण करताना तल्लीन होऊन नाचणारे भक्त असं दृश्य रेवातटी दिसू लागे! अशावेळी श्रीसद्गुनरु आणि सौ. आई या नामस्मरणात उत्साहाने सहभागी होत आणि मग या भक्तीपूर्ण वातावरणाचा कळस गाठला जात असे.
बडवाह येथे पालखी-पदयात्रेमध्ये ’दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणाने असाच रंग पकडला असताना, सद्गुिरु श्री श्रीराम महाराजांनी अचानक उत्स्फूर्तपणे सद्गुकरु श्री बापट गुरुजींचा हात पकडून त्यांना स्वतः बरोबर फुगडी घालायला लावली आणि भक्तांमध्ये आनंदोत्सवाची एक नवीनच लहर आली! यानंतर अनेक स्थळांवर सद्गु्रु श्री बापट गुरुजी, सौ. आईसाहेब, श्रीविष्णुगिरी महाराज, श्री दादा महाराज आणि इतर श्रेष्ठ व्यक्तींनी पालखी पदयात्रेत घातलेलं रिंगण आणि फुगड्या बघण्याचं भाग्य सर्व परिक्रमावासियांनी अनुभवलं आणि ते दृश्य ह्रदयाच्या कुपीत आयुष्यभरासाठी साठवून घेतलं!

दीपदान
भक्तीरसाची अशीच उधळण मैयातीरी होणाऱ्या दीपदानाच्या प्रसंगी होत असे. सामूहिक नामस्मरण आणि श्रीनर्मदा आरती झाल्यानंतर सर्वप्रथम श्रीसद्गुिरुंसह सर्व संतमंडळी दीपदान करत आणि त्यानंतर उपस्थित प्रत्येक बंधु आणि भगिनीला दीपदान करण्याची संधी दिली जात असे. नर्मदेच्या अथांग प्रवाहात अर्पण केलेले हे दिवे, तिच्या कंठात विराजमान होणारे हिरे-मोती असल्यासारखे लखलखत. ’घाटन घाट पूजावत कोटी रतन ज्योती’ या आरतीतल्या शब्दांचा तो प्रत्यक्ष अविष्कार असे. सद्गुररुंच्या दिव्यामागे सर्व दिवे एका रांगेने प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाऊ लागले की असं वाटत असे की असंच एकदिवस सद्गुयरुतत्त्व आपल्या प्रत्येक शिष्याला भोगनदी पार करून मोक्षतीरावर नेणार आहे!

आरती
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या स्थानांवर नित्याने होणारी गुरुवार-शनिवारची आरती, नर्मदा किनारीच्या त्या दिवशीच्या प्रत्येक मुक्कामी आवर्जून घेण्यात आली. नेमावर येथील सिद्धनाथ महादेव मंदिरात शनिवारच्या पालखी प्रदक्षिणेचा सोहळासुद्धा संपन्न झाला. स्वामी महाराजांनी रचलेली अनेक पदं आणि स्तोत्रं, श्रीगुरुजींनी त्यांना लावलेल्या भावपूर्ण चालीत नर्मदा तीरी म्हटली गेली. श्री