"करुणात्रिपदी – संपूर्ण अर्थ व विवेचन" - मनोगत
संपूर्ण जीवजगत ज्या नियमचक्राला बांधलेलं असतं, ती ही कर्मगती मोठी विलक्षण असते. कर्माची ही गती खरोखरच कोणाला समजत नाही. पूर्वजन्मांत कधीतरी निर्माण केलेली गती आज विस्मृतीत गेली, तरी तिचे परिणाम शिल्लक राहतात आणि त्या गतीच्या प्रतिक्रिया भोगताना पुन्हा ज्या काही क्रिया घडतात, त्यांची सुद्धा गती निर्माण होते आणि तेही परिणाम भोगायला लागतात, म्हणूनच ‘कर्मणो गहना गति:’ हे भगवान श्रीकृष्णाचे शब्द अगदी नि:संदिग्ध आणि सार्थ आहेत.

अशा वेळी प्रत्येक मनुष्याच्या हाती एकच स्वातंत्र्य असतं, भविष्य सुधारण्यासाठी सत्कर्म करत राहणं आणि वर्तमानातील भोगगती सुसह्य व्हावी म्हणून व्यक्तिगत अहंकार सोडून देऊन सदगुरुतत्वाला प्रार्थना करत राहणं. कृतकर्माच्या पश्चात्तापासह जेव्हा आपल्या मनात स्वतःबद्दलची करुणा उद्भवते, तेव्हा तीच करुणा कृपेचं रूप घेऊन सदगुरुतत्वातही प्रकटते.

कीव आणि करुणा ह्यांच्यात एक मूलभूत फरक आहे. जेव्हा एखाद्याबद्दल कीव येते, तेव्हा त्यात त्या व्यक्तीच्या अंधार्‍या भविष्याची सावली असते, त्या व्यक्तिचं अध:पतन समोर दिसत असतं. तसा प्रकार करूणेत अनुस्यूत नाही. करुणा ही या व्यक्तीच्या भल्यासाठी वाटते, त्यात त्या व्यक्तीच्या त्याचं भविष्य सुधारण्याच्या क्षमतेवर एक प्रकारचा विश्वास व्यक्त झालेला असतो. एखाद्या व्यक्तिचा चांगल्याकडे वळण्याचा निश्चय जेव्हा होतो, तेव्हा त्याच व्यक्तीबाबत वाटणारी कीव करुणेत रुपांतरीत होते.

हयाच न्यायाने सदगुरुतत्वाला आपली कीव न वाटता करुणा वाटावी, हा मूळ उद्देश कोणत्याही अध्यात्मसाधनेचा असतो. त्यासाठी मग स्तोत्र, मंत्र, नामजप, यज्ञ असे कित्येक तपप्रकार असू शकतात. असाच मूर्तिमंत कारुण्याचा आविष्कार असणारी स्तोत्ररचना म्हणजे सर्वसामान्यांना जमेल, रुचेल आणि भावेल अशी ही प.पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजकृत "करुणात्रिपदी" आहे. यात स्वामी महाराजांसारख्या कनवाळू सत्पुरुषाचं कारुण्य तर प्रतिबिंबित झालं आहेच, पण मोह हीच ज्यांच्या कर्मामागील चालकशक्ती असते, अशा सर्वसामान्यांच्या भूमिकेवर उतरून आईच्या मायेने त्यांनी साधना मार्गाची ही त्रिपदी, म्हणजे तीन पावलं जणू भक्ताचं बोट धरून चालायला शिकवली आहेत. सत्कर्माच्या परिणामांतही निसर्गनियमाप्रमाणे जे कालांतर जातं, त्या कृपा-प्रतीक्षेच्या काळातही मनोबल वाढवण्याची क्षमता, तेवढं सामर्थ्य करुणात्रिपदीत आहे. प्रत्येकाने या स्तोत्रातालं स्वयंसिद्ध सामर्थ्य जरूर अनुभवावं.

ह्या स्तोत्रात जरी दत्तावाताराचं वर्णन असलं, तरी त्यात अवगुंठित झालेली कर्मकहाणी सर्वसामान्यांची असल्याने भगवान दत्तात्रेयांच्या ठिकाणी ईश्वरशक्तीचं आपलं आवडतं प्रतीक कल्पून ह्या त्रिपदीचं पठण सर्वांनी अवश्य करावं. ईश्वरीकृपेचा सहज सोपा मार्ग दाखवणाऱ्या ह्या करुणात्रिपदीचं अंतरंग सर्व भक्तांना समजावं, उमजावं आणि जाणवावं हीच सद्गुरुतत्त्वाचरणी प्रार्थना.

प्रत्येकाने ह्या स्तोत्रातलं स्वत:सिद्ध सामर्थ्य जरूर आजमावं. अनुभव येईल की सत्कर्मांच्या परिणामांतही जे कालांतर जातं, त्यात मनोबल वाढवण्याची क्षमता, सामर्थ्य करुणात्रिपदीत आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाला यावा, तशी करुणा साध्यतेची युक्ती प्रत्येकाला साध्य व्हावी ही सद्गुरुतत्त्वाचरणी माझी प्रार्थना असेल.

ईश्वरीकृपेचा सहज सोपा मार्ग दाखवणार्‍या ह्या करुणात्रिपदीचे अंतरंग ईश्वरीशक्तीच्या सर्व भक्तांना समजावे, उमजावे आणि जाणवावे हीच सद्‌गुरुंचरणी प्रार्थना.


अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

- बापट गुरुजी


सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...


 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी