यज्ञ एक वरदान

Yadnyaयज्ञ ही एक सर्वश्रेष्ठ सामूहिक साधना आहे. सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय व प्रकाश म्हणजे गती होय. यज्ञामध्ये प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्निच्या प्रकाशावरील एकाग्रतेसहित केलेल्या सामुदायिक मंत्र पठणाने मंत्रशक्तिचा प्रचंड गुणाकार होतो व त्याचा लाभ स्वशक्तिपुनर्मेळ (Bio-feedback) पद्धतीने व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांना होतो.वैदिक यज्ञ हा आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांद्वारे श्रीगुरुजींनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सहभागासहित सुरू केला आहे. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, हरिहर यज्ञ,पितृयज्ञ, नर्मदा स्वाहाकार,गंगालहरी स्वाहाकार,गीता यज्ञ,शक्ती स्वाहाकार इ.चा समावेश आहे.

"आमंत्रण सर्वांना, आग्रह कोणालाही नाही."सर्व जातींचे-पंथांचे-धर्मांचे स्त्री, पुरुष, कोणत्याही व्यक्तीला या यज्ञ कार्यक्रमात सहभागी होण्याची व मंत्र पठण-हवन करण्याची मुभा आहे;कारण प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा खराखुरा उद्धार करवून घेण्याचा हक्क निसर्गाने दिला आहे.

-परमपूज्य सद्गुरू श्री.बापट गुरुजी

श्रीगुरुजी प्रत्येक यज्ञ हा राष्ट्रकल्याण प्रार्थनेने प्रज्वलित करतात –‘हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरणशुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता, आम्ही, यज्ञाद्वारे साध्य करीत आहोत.' वेदांमधील ईश्वराची उपासना ही सर्वतयः यज्ञाद्वारे होती. यज्ञ म्हणजे देवांचे मुख असून यज्ञातील मंत्रपठण व हवनादि क्रियांद्वारे देवांची तुष्टि होते व परिणामतः सृष्टिची पुष्टी होते अशी वेदांतील यज्ञ संकल्पना आहे.
विज्ञानाच्या निष्कर्षांच्या आधारे वेदांतील यज्ञाची जर उपनिषदांतील ज्ञानाशी सांगड़ घातली, तर त्याची परिणती मानवाच्या, पर्यायाने समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी होईल हे निश्चित ! एकाग्रतेसाठी सर्वश्रेष्ठ प्रतीक म्हणजे प्रकाश ! मंत्र, तंत्र व यंत्र तसेच पंचमहाभूतांचे एकत्रीकरण यज्ञामधे आहे. मनाला त्राण देतो तो मंत्र आणि तनाला त्राण देते ते तंत्र. पूजा, हवानादी क्रिया या तंत्राचा भाग आहेत. तर शास्त्रोक्त ध्वनिनिर्मिती हा मंत्राचा भाग आहे. मंत्रधातूचा अर्थच गुह्य परिभाषा असा आहे. तर “य” हा शब्द निर्मितीवाचक आहे. निर्मितीला त्राण देणारे ते यंत्र. मंत्र, तंत्राद्वारे जी शक्तिनिर्मिती केली जाते, त्याचा मोठया प्रमाणात गुणाकार करण्याचे सामर्थ्य यंत्रामधे असते. सगळ्यात प्रभावी यंत्र म्हणजे “यज्ञ” आहे.प्रकृतीचे जगत् निर्मितीचे कार्य पंचमहाभूतांच्या माध्यमातून चालते. यज्ञामधे पाचही महाभूतांचा समावेश आहे. माती आणि पाणी यांच्या मिश्रणातून यज्ञवेदी बांधली जाते. यज्ञाचे प्रज्वलन अग्निद्वारे होते, म्हणजेच तेज तत्त्व येथे असते, हवन क्रियेतून धूम्ररूपी वायु निर्माण होतो व आकाशतत्वाचे निदर्शक असे शब्दसमुच्चय म्हणजेच मंत्र, ज्याद्वारे यज्ञातील हवन केले जाते.

प्रकाश हेच उत्तम माध्यम का ? ज्ञात सृष्टीत प्रकाश हाच सर्वांत गतीमान आहे. प्रति सेकंदाला सुमारे ३,००,००० कि.मी. इतक्या वेगाने प्रकाशाचा कण प्रवास करतो. विज्ञानाप्रमाणे ज्याची गती जास्त, तेवढा तो शक्तिमान. म्हणजेच दृश्य सृष्टीत प्रकाशाएवढे शक्तिमान काहीच नाही. प्रकाश हा उत्तम संदेशवाहक आहे. विज्ञानाला प्रकाश प्रत्यक्ष पहाता आलेला नाही. एखाद्या वस्तुवर प्रकाश पडला तर ती वस्तु आपल्याला दिसते, पण प्रकाश दिसत नाही. म्हणुनच प्रकाश हा व्यक्त आणि अव्यक्त सृष्टीच्या सीमारेषेवर आहे असे मानले जाते.प्रकाशाचा संदेशवाहक गुण आणि त्याची सर्वाधिक गती यांचा समन्वय जर हेतुबरोबर साधला तर हेतूपूर्ती अधिक लवकर आणि अधिक यशस्वी असेल. हेतू हा गतीबरोबर प्रवास करतो.

सद्हेतुने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ. ज्ञात्या विद्वानांनी यज्ञाची व्याख्या, “य” म्हणजे निर्मिती आणि “ज्ञ” म्हणजे ज्ञान, म्हणजेच जेथे ज्ञानाची निर्मिती होते, तो यज्ञ, अशी केली आहे. यज्ञातील हवन क्रिया म्हणजे केवळ जाळणे नव्हे. आईनस्टाइन, पोडोव्हस्की आणि रोझेन यांचा EPR Paradox (EPR चा परस्पर विरोध ) म्हणतो, की वस्तुतील ईलेक्ट्रोन पैकी एकाला एखादी प्रेरणा दिली तर राहिलेल्या ईलेक्ट्रोन्सवर त्याच्या विरुध्द परिणाम ताबडतोब होतो. हाच सिध्दांत हवन क्रियेत आहे. यज्ञातील हवनाने पदार्थाचे भस्मामधे रूपांतर होते, कारण उष्णता गतिशास्त्राच्या (Thermodynamics) नियमाप्रमाणे काहीच नष्ट होत नाही. परंतु त्या पदार्थरुपाचा नाश झाल्यावर त्याचा उलट परिणाम असा होतो, की वृध्दिची प्रेरणा राहिलेल्या ईलेक्ट्रोन्सवर ताबडतोब सुरु होते. हवनातील वृध्दिच्या प्रेरणेला हेतूची सीमा असते. व्यक्तिगत ऐश्वर्यासाठी केलेले हवन हे वृध्दिची प्रेरणा व्यक्तिपुरती देते; तर राष्ट्रकल्याणासाठी केलेले हवन हे संपूर्ण राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देते.हवन म्हणजे त्यागच!

सन्मान, संगतीकरण आणि दान ही यज्ञाची त्रिसूत्री आहे. श्रीमद् भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. गीतेतील संकल्पनेप्रमाणे जपयज्ञ, भूतयज्ञ इ. बरोबरच वैदिक यज्ञही “यज्ञ” या व्याखेत समाविष्ट आहे. यज्ञ म्हणजे ‘कर्मधुलाई’चे उत्कृष्ट साधन आहे. परंतु ते साध्य नव्हे. ‘मोक्ष किंवा मुक्ती’ हेच मानवाचे अंतिम परमोच्च साध्य आहे. यासाठी यज्ञावरील एकाग्रता प्रचंड शक्ति सामर्थ्य निर्माण करते, हे जो अनुभवेल, त्यालाच कळेल.हरि ओम !

 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी