विचारें मना तूंचि शोधूनि पाहें - मनोगत PDF Print E-mail
  
Tuesday, 25 February 2014 19:08

आपल्याकडे एक दंतकथा सांगितली जाते. एकदा व्यासमुनी विशेष पर्वानिमित्त भल्या पहाटे गंगेच्या किनारी स्नानासाठी गेले. आपला दंड, कमंडलू आणि इतर काही साहित्य त्यांनी गंगाकिनारी काढून ठेवलं. आता स्नानासाठी पाण्यात उतरणार, तोच त्यांच्या मनात आलं, की ‘इथे एवढ्यात बऱ्याच व्यक्ती, साधू स्नानासाठी येतील, मग त्यांच्या वस्तू कोणत्या आणि आपल्या कोणत्या, हे आपल्याला कसं बरं समजणार?’ त्यावर उपाय म्हणून त्यांनी तिथे एक छोटा खड्डा केला आणि त्यात त्या वस्तू पुरून ठेवल्या. पण आता आपल्या वस्तू आपण कुठे पुरून ठेवल्या आहेत, हे कसं ओळखणार? मग त्यांनी त्या जागी खुणेसाठी एक छोटं शिवलिंग तयार केलं आणि निश्चिंत मनाने ते स्नानासाठी पाण्यात उतरले.

पण तेवढ्यात एक गंमत झाली होती. कोणीतरी त्यांना शिवलिंग स्थापन करताना आणि मग स्नानासाठी पाण्यात उतरताना बघितलं होतं. व्यासमुनी होते ते, कोणी सामान्य व्यक्ती नव्हती! त्यांनी ज्याअर्थी असं केलं, त्याअर्थी स्नानाआधी असंच करणं अपेक्षित असणार, असं म्हणून त्या मनुष्यानेसुद्धा किनाऱ्यावर शिवलिंग स्थापन केलं आणि स्नानासाठी तो पाण्यात उतरला. काही क्षणांतच ही गोष्ट षट्कर्णी झाली आणि व्यासमुनी आपलं स्नान आटोपून, उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन बाहेर येतात, तोपर्यंत गंगाकिनाऱ्यावर व्यासमुनींच्या शिवलिंगाशेजारी तशीच शेकडो शिवलिंगं विराजमान झालेली होती! अर्थातच व्यासमुनींपुढे कपाळाला हात लावण्याशिवाय पर्याय नव्हता!

ह्या दंतकथेतला प्रतीकार्थ लक्षात घेण्याजोगा आहे, कारण सामान्यतः आपली स्थितीसुद्धा अशीच झालेली असते. शास्त्रग्रंथांत सांगितल्याप्रमाणे आपण सर्व प्रथा, सण, उत्सव, पूजोपचार इत्यादी पाळतोही, पण त्यामागच्या नेमक्या ज्ञानाचा आणि आपल्या पूर्वसुरींना अपेक्षित असलेल्या त्यातल्या गर्भितार्थाचा आपल्या मन-बुद्धीत शिरकावच झालेला नसतो. सद्य काळात अशा अज्ञानातून निर्माण झालेली दिसते, ती स्वधर्माविषयीची अनास्था आणि पूर्वापार परंपरांचं आंधळ्या रूढींमध्ये झालेलं रूपांतरण.

‘उत्तम ते घ्यावें। मळमळीत अवघेंचि टाकावें ॥ ’ ही समर्थउक्ती आचरणात आणण्याअगोदर प्रथम आपल्या मनाला विचारांची सवय लावावी लागते. ‘का, कसे आणि कशासाठी’ ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या धर्माने प्रत्यक्ष दिलेली नसली, तरी ती विचारांती समजून घेता येतात हे निश्चित. अशीच काही शास्त्रनिष्ठ आणि विद्न्यानाधिष्ठ उत्तरं गणपती प्रतीकार्थ, लक्ष्मीपूजन, श्राद्ध, जलाभिषेक, तुळशीवंदन, संक्रांत, नामस्मरणासारख्या आध्यात्मिक साधना इत्यादी धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांसंदर्भात देण्याचा प्रयत्न दैनिक ‘सामना’मधून प्रसिद्ध केलेल्या लेखमालेद्वारे केला होता. ह्या पुस्तकात संकलित केलेल्या त्या लेखांद्वारे आपल्या परंपरा आणि प्रथांमागचं ज्ञान तसेच त्यांमागील समाजोन्नतीचा हेतू समजून प्रत्येकाला आत्मविश्वासपूर्ण धर्माचरण साध्य व्हावं, हीच विश्वनियंत्या ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.

- बापट गुरुजी

Last Updated ( Friday, 28 February 2014 09:54 )
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी