चित्तसद्‍बोध नक्षत्रमाला : संपूर्ण अर्थ आणि विवेचन - मनोगत
भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेला एक फार मोठा सिद्धांत म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी. आधुनिक विज्ञानाला अणुसंरचनेचा आणि मानवी देहातल्या प्लेक्ससचा पत्ता लागायच्या अगोदर प्राचीन भारतीय धुरीणांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताची प्रत्यक्ष अनुभूती ज्यांनी ज्यांनी घेतली, ते ते त्या वैश्विक शक्तीशी एकरूप होऊ शकले आणि त्यांच्या मुखातून स्रवलेले उपदेश आज अजरामर झाले आहेत. त्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यय देणारं प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं हे प्रस्तुत स्तोत्र चित्तसद्बोधनक्षत्रमाला. स्वामी महाराजांनी गुरुपदावरून केलेलं सामान्यजनांचं हे अवलोकन आहे. कुठल्याही पातळीवरच्या मनुष्याच्या चित्तातली चलबिचल टिपण्याचं कौशल्य असलेल्या महापुरुषाचे त्यांच्या उत्तरायुष्यातले हे उद्गार आहेत एवढं समजलं, तरी ह्या स्तोत्रात सांगितलेल्या उपदेशाचं महत्त्व आपल्या अंतःकरणात ठसू शकेल. ह्या उपदेशाला स्वामी महाराजांनी ‘नक्षत्रमाला’ अर्थात नक्षत्रांप्रमाणे सत्तावीस श्लोकांची गुंफण असलेली माला असं नाव दिलं आहे. त्यात जशी सत्तावीस आकड्यांची उपमा साधली आहे, तसंच ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ ह्या सिद्धांताशी अर्थसाधर्म्यही साधलं आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे ब्रह्मांडात जशी रचना आहे, तशीच ती पिंडातही आहे. जसं ब्रह्मांडात मोकळं आकाश आहे, तसंच चित्ताकाशपिंडातही आहे. अवकाशात जशी नक्षत्रं चमकत असतात, तशाच चित्ताकाशातही निरनिराळ्या भावभावना प्रकाशित होत असतात. फरक एवढाच असतो, की जशी परमेश्वर आपली सत्ता ब्रह्मांडावर चालवत असतो, तशी सत्ता मनुष्य आपल्या चित्तावर चालवत नाही, किंबहुना तसा प्रयत्न सुद्धा करत नाही. परिणामतः ब्रह्मांडातली परमेश्वरी शक्ती त्याच्या चित्तात तो पूर्णांशाने प्रकटवू शकत नाही. त्याला तशी ती प्रकटवता यावी, म्हणून जे जे काही आचरण मानवाकडून अपेक्षित आहे, ते ते सर्व स्वामी महाराजांनी ह्या सत्तावीस श्लोकांमध्ये समाविष्ट केलं आहे. ह्यात जे अपेक्षित वर्तनाचं वर्णन आहे, त्या पलीकडे आणखी काही वेगळा उपदेश मानवासाठी असू शकत नाही. ह्या स्तोत्रात सांगितलेलं ज्ञान या अगोदर कितीतरी वेळा निरनिराळ्या शब्दांमध्ये आपल्या कानांवरून गेलेलं असूही शकेल. परंतु ते कळल्यानंतर गरज असते, ती वळण्याची. ज्याला अध्यात्मात खरोखर प्रगती करायची आहे, त्याने कितीही ‘कळलं’ असलं, तरी ‘वळण्यासाठी’ ह्या स्तोत्राचं आत्मशोधनपूर्वक पठण जरूर करावं. स्वामी महाराजांची अनेक स्तोत्रं मंत्रस्वरूप आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्ञानासहित केलेल्या संख्यात्मक पठणाला महत्त्व आहे. परंतु ह्या स्तोत्राचं संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक पठण अपेक्षित आहे. ह्या स्तोत्राचं पठण करताना त्यातल्या प्रत्येक उच्चारासोबत त्यातलं उपदेशामृत आणि त्यामागील स्वामी महाराजांची कळकळ, दोहोंचाही अनुभव प्रत्येकाने घ्यावा आणि आपलं कल्याण साधावं, हीच सद्गुरूतत्त्वाचरणी प्रार्थना.

- बापट गुरुजी
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी