"नमो गुरवे वासुदेवाय : मंत्र आणि यंत्र साधना " - मनोगत
      हिंदू संस्कृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिला असलेलं वैविध्यतेचं वरदान. अज्ञान मूलक अशा भ्रामक समजूतीमुळे आणि अर्धवट ज्ञानामुळे कधी कधी हेच वरदान विवादाचं कारण बनतं आणि मग त्यातून "आपल्याकडे देवच मुळी ३३ कोटी असल्याने इतर धर्मांमध्ये दिसतो तसा आपल्या हिंदू धर्मात एक संधपणा राहिलेला नाही" अशी विधानं केली जातात. वस्तुतः आपल्या संस्कृती इतकी तत्त्वज्ञानाने समृद्ध असलेली संस्कृती जगाच्या पाठीवर कोठेही नाही. तिला समजून घेण्यासाठी आवश्यकता आहे, ती केवळ योग्य दृष्टिकोनाची. आपल्याकडे सांगितलेले ३३ कोटी देव सुद्धा वेदांमध्ये सांगितलेल्या वसु, रुद्र, आदित्य इत्यादींचे कार्यभेदाने निर्माण झालेले शक्तिप्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या आवश्यकते प्रमाणे त्याला उपासना मिळावी, म्हणून आपल्या पूर्वसूरींनी उदार धोरण ठेवून शक्तिप्रकारांची तेवढी प्रतीकं निर्माण केली आणि समाजापुढे त्याच्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणासाठी ठेवली. त्या सर्व प्रतीकांमागील 'अनेकांतील एकत्व' पाहण्याचा दृष्टिकोन जर ठेवला, तर आपल्या संस्कृतीतल्या विचार वैविध्याचा निश्चितपणे उलगडा होईल.

      ज्याप्रमाणे विविध देवतांच्या प्रतीकांमागे एकच ईश्वरी तत्त्वविहीत असतं, त्याप्रमाणेच त्या देवतांच्या प्रत्येक नामामागे एक-नाम-तत्त्व असतं, आणि ते म्हणजे सद्गुरुतत्त्व. निर्गुणनिराकार परब्रह्मात कोणताही गुण असू शकत नाही, अर्थात ते करुणा संपन्न असूच शकत नाही. जेव्हा त्या परब्रह्मात त्याच्या मायाशक्तीमुळे करुणा उत्पन्न होते, तेव्हा तेच सद्गुरुतत्त्व असतं. प्रत्येक उपासनेमागे ह्या एकाच सद्गुरुतत्त्वाची प्रेरणा असते, मग एखाद्या देवप्रतीकाचा एखादा भक्त जर गुरुसंकल्पनेवर विश्वास न ठेवणारा असला, तरीही त्या देव प्रतिमेद्वारे त्याला मिळणाऱ्या अनुभवांमागे अथवा मार्गदर्शनामागे प्रेरणाही सदगुरुतत्त्वाचीच असते. अनेकांतल्या ह्या एक-नाम-तत्त्वाचं निर्देशन करणारं हे सद्गुरुतत्त्वाचं नाम म्हणजे 'नमोगुरवेवासुदेवाय'. परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांच्या अधिष्ठानावर निर्माण झालेलं हे नाम संपूर्ण सद्गुरुतत्त्वाचं निर्देशक आहे, आणि म्हणूनच गुरुपरंपरेत असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्वसाधकांसाठी, भक्तांसाठी किंबहुना अध्यात्मात काहीतरी गती प्राप्त करू इच्छिणाऱ्या नवजिज्ञासूंसाठी देखील हा नाममंत्र आणि त्याचं 'श्रीगुरुवासुदेवयंत्र' पूरक अथवा मुख्य अशा दोन्ही साधना प्रकारांद्वारे उपयुक्त ठरू शकतं. कोणतीही उपासना योग्य रितीने फलित होण्यासाठी प्रथम तिच्या मागील तत्त्वाचं एक तर पूर्ण ज्ञान करून घेणं आवश्यक असतं, किंवा ते जमत नसेल तर मग त्यावर शंकारहित, प्रश्नविरहित असा संपूर्ण विश्वास तरी ठेवावा लागतो. ह्या नाममंत्र-यंत्राची महती सर्वांना समजावी आणि साधक-वाचक-भक्तांच्या मनात, चित्तात, बुद्धीत ह्या साधनेविषयी कोणत्याही प्रकारची शंका-कुशंका राहू नये, ह्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचं प्रयोजन आहे. ह्या पुस्तकाद्वारे वासुदेवरूपी सद्गुरुशक्ती सर्वांना साधनेची आणि आपली आत्मिक उन्नती साधून घेण्याची प्रेरणा देवो, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.


|| नमोगुरवेवासुदेवाय ||


- बापट गुरुजी
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी