॥ श्रीगुरु वासुदेव यंत्र ॥
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीमद्‍ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक २७ डिसेंबर २०१२ रोजी, श्रीदत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांनी श्रीगुरु वासुदेव यंत्राचे विमोचन केले. मंत्रसाधनेला यंत्रसाधनेची जोड दिली तर त्यातून निर्माण होणारी प्रचंड आध्यात्मिक शक्ती साधकाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या किंबहुना संपूर्ण विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयुक्त ठरेल या भव्य हेतूने श्री गुरुजींनी हे यंत्र सर्व साधकांना उपलब्ध करून दिले आहे. ’नमो गुरवे वासुदेवाय’ हा सिद्ध मंत्र गुंफलेले हे यंत्र म्हणजे गुरुपरंपरेतील सर्व साधकांना भुक्ती आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारी गुरुकिल्लीच आहे! स्वामी महाराजांची निस्सीम भक्ती करणारे आणि खोपोली येथे त्यांचे मूर्तीस्थान निर्माण करणारे परमपूज्य सद्‍गुरु श्री भाऊमहाराज करंदीकर यांनी हा नामजप सर्वप्रथम भक्तांना दिला. या नामजपाचा १५१ कोटी जपसंख्येचा संकल्प त्यांचेनंतर परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींनी भक्तांकडून आवश्यक त्या हवन, मार्जन व अर्चनासह सन २००८ मध्ये पूर्ण करून घेतला. या संकल्पपूर्ती नंतर या नामाला सिद्धमंत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नमः अर्थात नमन ही भक्ताची शक्ती, वासुदेव हे कीलक आणि गुरवे हे बीज अशी त्रिपुटी या मंत्रात सिद्ध आहे. या मंत्रातून निर्माण होणार्‍या शक्तीला योग्य दिशा देऊन, या शक्तीचे संनियंत्रण करण्याचे कार्य यंत्राद्वारे केले जाते. यंत्रशास्त्राच्या नियमांना अनुसरून बिंदू, वर्तुळ, त्रिकोण, कमलदल आणि चौकोन ह्या भौमितीय आकारांची विशिष्ट संरचना यात असून, यंत्राच्या केंद्रस्थानी ॐकार आहे. विश्वाची उत्पत्ती आणि अंत सूचित करणारा हा ॐकार, शक्तीदर्शक अधोमुखी त्रिकोणात संपुटित झाला आहे. यंत्राच्या ह्या मूळ गाभ्याभोवती ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी त्रिकोणांची एकरूप झालेली रचना आहे. या संरचनेमुळे निर्माण झालेले सहा उपत्रिकोण आणि मुळातले तीन त्रिकोण, असे एकूण नऊ त्रिकोण यंत्रात सामावलेले आहेत. या नऊ त्रिकोणातून पंचमहाभूतं आणि मन-बुद्धी-चित्त-अहंकार हे अंतःकरणाचे चार प्रकार अभिव्यक्त होतात. या संरचनेच्या बाह्य दिशेने असणारे वर्तुळ विश्वाची चक्राकार गती दर्शवते तर दहा पाकळ्यांचं पद्मदल दशेंद्रियांचा निर्देश करते. यंत्रशास्त्रानुसार पद्मदळ हे सृजनाचे प्रतीक आहे. या पद्मदलात नमो गुरवे वासुदेवाय ही अक्षरे गुंफण्यात आली आहेत. सर्वात बाह्य दिशेने असणार्‍या चौकोनाला चार द्वारे आहेत. याला यंत्रशास्त्रात भुपूर असे म्हणतात. बहुभूज आकारांमधला सगळ्यात लहान आकार असलेला चौकोन हे बहुउद्देशीय सृजनाचं प्रतीक आहे. यंत्रातल्या विविध आकारांसाठी रंगसंगतीचं नियोजनही अत्यंत विचारपूर्वक केले आहे, उदाहरणार्थ लालसर गुलाबी रंग श्री-तत्त्व दर्शवतो तर निळा आणि पिवळा रंग अनुक्रमे धैर्य आणि शांती दर्शवतात. हिरवा रंग हा सफलतेचं, पुष्टीचं प्रतीक आहे. ह्या यंत्रावर एकाग्रता केल्याने साधकाला इह आणि पारलौकिक समृद्धीची प्रेरणा मिळते आणि साधक शाश्वत अभ्युदयाकडे वाटचाल करतो.

सद्‍गुरुंतत्त्वाचं सामर्थ्य प्रदान करणारे श्रीदत्तात्रेय यंत्र आणि तंत्रशास्त्रात अंतर्भूत असलेलं बगलामुखी यंत्र अशी दोन्ही यंत्र ह्या यंत्रामध्ये गुप्तरीत्या गुंफली आहेत. त्यामुळे ह्या एकाच यंत्रावर भक्तीपूर्वक एकाग्रता केल्यास किंवा यंत्रसाक्षीने मंत्रजप केल्यास वासुदेवरूपी श्रीदत्तात्रेय आपल्या सर्वशक्तींसह साधकाच्या मागे पहाडासारखे उभे राहून साधनेआड येणार्‍या सर्व आंतर्बाह्य शत्रूंचा बिमोड करतील ह्यात शंका नाही. सारांशाने ह्या यंत्रातून निर्माण होणारी शक्ती जशी प्रेरक असेल तशी ती रक्षकही असेल. साधनेतून लवकर फलनिष्पत्ती प्राप्त होण्यासाठी साधकाने नाममंत्राच्या प्रत्येक आवर्तनाबरोबर स्वामी महाराजांचे आणि सद्‍गुरुतत्त्वाचे स्मरण करणे अपेक्षित आहे. ही साधना करण्यासाठीची प्रमुख अट म्हणजे हा मंत्र म्हणण्याचा आणि यंत्रसाधना करण्याचा आदेश सगुण सद्‍गुरुंकडून साधकाला मिळाला पाहिजे. ही साधना करण्यासाठी अन्य कसलेही बंधन नाही. गुरू परंपरेत नसणार्‍या एखाद्या भक्तानेसुद्धा आपल्या इष्ट दैवताला किंवा आवडत्या प्रतिमेला गुरूस्थानी मानून या मंत्रयंत्राची उपासना केली तरीही त्याचाही तोच परिणाम असेल. ही साधना आपल्या मूळ साधनेला अनुकूल असल्याने पूरक म्हणून करावयाची आहे. कोणत्याही जाती-धर्म-लिंग-पंथाचा साधक सश्रद्ध भावाने आणि ज्ञानपूर्वक केलेल्या संकल्पाने ही यंत्र साधना करू शकतो. या मंत्र-यंत्र साधनेवर परमपूज्य श्रीसद्गुरूंनी केलेले विवरण 'नमो गुरवे वासुदेवाय:मंत्र व यंत्र साधना' ह्या ग्रंथाद्वारे स्वतंत्ररित्या उपलब्ध आहे.

प.पू.श्री सद्गुरुंच्या कृपेने १०१ कोटी 'नमो गुरवे वासुदेवाय' नामजप दि.२१ जून २०१४ रोजी पूर्ण झाला आहे.
 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१७
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१६
विविध मासिकांमध्ये प्रकाशित नवीन लेख
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  संकेतस्थळ अतिथी